भोंदू बाबा अशोक खरातला सिद्धपुरुष बनवणारा मास्टरमाईंड कोण? बड्या नेत्याचे नाव समोर, अडचणी वाढणार
अशोक खरात भोंदूगिरी प्रकरणात आता सिन्नरच्या जगदंब पतसंस्थेचे संस्थापक पोलिसांच्या रडारवर आले आहेत. खरातची या संस्थेत ३२ खाती असून कोट्यवधींच्या संशयास्पद व्यवहारांचा तपास शिर्डी पोलीस करत आहेत.

भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी नवनवीन अपडेट समोर येत आहे. अशोक खरातच्या विविध कृत्यांचा तपास जसा पुढे सरकत आहे, तसे नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. समता पतसंस्थेतील १०० खात्यांचा तपास सुरू असतानाच आता सिन्नर येथील जगदंब पतसंस्थेचे संस्थापक नामकरण आवारे हे पोलिसांच्या रडारवर आले आहेत. शिर्डी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास आता आवारे यांच्याकडे वळवला असून त्यांच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू केली आहे.
जगदंब पतसंस्थेत 32 खाती
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात याने नामकरण आवारे यांच्या जगदंब पतसंस्थेचा वापर मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहारांसाठी केला होता. या एकाच पतसंस्थेत खरातची ३२ विविध खाती असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्राथमिक तपासात या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांची संशयास्पद देवाण-घेवाण झाल्याचे समोर आले आहे. ही रक्कम नेमकी कुठून आली आणि कुठे वळवण्यात आली, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. नामकरण आवारे हे खरातचे निकटवर्तीय मानले जातात. ते भाजपा आघाडीचे प्रमुख होते. त्यामुळे या व्यवहारांमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता का, याची पडताळणी केली जात आहे.
अशोक खरातला समाजासमोर एक सिद्धपुरुष म्हणून मांडण्यात नामकरण आवारे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप आहे. आवारे हे खरातचे कट्टर भक्त म्हणून ओळखले जात होते. खरातच्या भोंदूगिरीला पाठबळ देण्यासाठी आणि त्याला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा आणि संस्थेचा वापर केल्याचे बोलले जात आहे. या संपूर्ण घटनेमुळे आता आवारे शिर्डी पोलिसांच्या रडारवर आले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
समता पतसंस्थाही अडचणीत
तर दुसरीकडे समता पतसंस्था फेडरेशनचे राज्याध्यक्ष काका कोयटे हे देखील खरातचे भक्त असल्याचे समोर आल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. नाशिक येथे तीन वर्षांपूर्वी झालेल्या समता पतसंस्था फेडरेशनच्या भव्य पुरस्कार सोहळ्यात अशोक खरात याला प्रमुख पाहुणा म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. या सोहळ्याला महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. एका भोंदूला अशा प्रकारे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आता त्यांच्यावर टीका होत आहे.
समता पतसंस्थेच्या राज्यभर अनेक शाखा आहेत, जिथे खरातचे १०० पेक्षा जास्त खाती असल्याचे आधीच समोर आले आहे. आता जगदंब मधील ३२ खात्यांच्या माहितीमुळे या प्रकरणाची व्याप्ती अजून वाढली आहे. शिर्डी पोलीस या दोन्ही पतसंस्थांमधील आर्थिक साखळी तोडण्याच्या तयारीत असून लवकरच काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.