मुंबईसह महाराष्ट्राच्या डोक्यावर वीज संकट, महावितरण म्हणतं, सकाळ-संध्याकाळ वीज वापर कमी करा, वाचा सद्यस्थिती!

| Updated on: Oct 10, 2021 | 11:58 PM

देशभरात कोळसा टंचाई निर्माण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून औष्णिक वीजनिर्मिती कोळशाअभावी हळूहळू कमी होत आहे. त्यातच महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील 13 संच कोळशाअभावी सध्या बंद पडलेत. यात महानिर्मितीचे चंद्रपूर, भुसावळ व नाशिक प्रत्येकी 210 मेगावॅटचे तसेच पारस- २५० मेगावॅट आणि भुसावळ व चंद्रपूर येथील 500 मेगावॅटचा प्रत्येकी एक संच बंद झाला.

मुंबईसह महाराष्ट्राच्या डोक्यावर वीज संकट, महावितरण म्हणतं, सकाळ-संध्याकाळ वीज वापर कमी करा, वाचा सद्यस्थिती!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

मुंबई : कोळशाच्या टंचाईमुळे महावितरणाला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील 13 संच सद्यस्थितीत बंद पडलेत. त्यामुळे तब्बल 3330 मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प पडलाय. विजेची ही तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या वीजखरेदीसह जलविद्युत आणि अन्य स्त्रोतांकडून वीजपुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यात विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून, वीजग्राहकांनी मागणी व उपलब्धता यामध्ये समतोल राखण्यासाठी सकाळी 6 ते 10 आणि सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत विजेचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आलेय.

औष्णिक वीजनिर्मिती कोळशाअभावी हळूहळू कमी

देशभरात कोळसा टंचाई निर्माण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून औष्णिक वीजनिर्मिती कोळशाअभावी हळूहळू कमी होत आहे. त्यातच महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील 13 संच कोळशाअभावी सध्या बंद पडलेत. यात महानिर्मितीचे चंद्रपूर, भुसावळ व नाशिक प्रत्येकी 210 मेगावॅटचे तसेच पारस- २५० मेगावॅट आणि भुसावळ व चंद्रपूर येथील 500 मेगावॅटचा प्रत्येकी एक संच बंद झाला. यासोबतच पोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडचे (गुजरात) 640 मेगावॅटचे चार संच आणि रतन इंडिया पॉवर लिमिटेडचे (अमरावती) 810 मेगावॅटचे तीन संच बंद आहेत. यामुळे महावितरणला औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमधून कराराप्रमाणे मिळणाऱ्या विजेमध्ये घट होत आहे.

तूट भरून काढण्यासाठी खुल्या बाजारातून (पॉवर एक्सचेंज) वीज खरेदी सुरू

विजेच्या मागणी आणि उपलब्धता यामधील सध्या 3330 मेगावॅटची तूट भरून काढण्यासाठी खुल्या बाजारातून (पॉवर एक्सचेंज) वीज खरेदी सुरू आहे. देशभरात विजेची मागणी वाढल्यामुळे वीज खरेदीचे दर महाग होत आहे. खुल्या बाजारातून 700 मेगावॅट विजेची खरेदी 13 रुपये 60 पैसे प्रतियुनिट दराने करण्यात येत आहे. तर आज सकाळी रियल टाईम व्यवहारातून 900 मेगावॅट विजेची 6 रुपये 23 पैसे प्रतियुनिट दराने खरेदी करण्यात आली. यासोबतच कोयना धरण तसेच इतर लघु जलविद्युत निर्मिती केंद्र आणि अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांद्वारे वीज उपलब्ध करण्यात येत आहे.

पाऊस झाल्यामुळे आज विजेच्या मागणीत घट

कोळसा टंचाईचे सावट गडद होत असतानाच राज्यात उष्मा वाढल्यामुळे विजेची मागणी देखील वाढली. राज्यात (मुंबई वगळून) काल शनिवारी 17,289 मेगावॅट विजेची मागणीप्रमाणे महावितरणकडून पुरवठा करण्यात आला. तर गेल्या 24 तासांमध्ये राज्याच्या काही भागात पाऊस झाल्यामुळे आज विजेच्या मागणीत घट झाली. आज रविवारी सकाळी 11.30 वाजता राज्यात 18,200 मेगावॅट तर महावितरणच्या कार्यक्षेत्रात 15 हजार 800 मेगावॅट विजेची मागणी होती. विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार कृषी वाहिन्यांवर दररोज 8 तास दिवसा किंवा रात्री चक्राकार पद्धतीने थ्री फेज वीजपुरवठा करण्यात येत आहे.

विजेचा वापर अतिशय काटकसरीने करावा

कोळसा टंचाईमुळे विजेचा तुटवडा वाढण्याची शक्यता अधिक असल्याने मागणी आणि पुरवठा यात समतोल ठेवण्यासाठी वीजग्राहकांनी सकाळी 6 ते 10 आणि सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेदरम्यान विजेचा वापर अतिशय काटकसरीने करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले. विजेची सर्वाधिक मागणी असणाऱ्या कालावधीत विजेचा वापर कमी झाल्यास मागणी व उपलब्धता यातील तूट कमी होईल व भारनियमन करण्याची गरज भासणार नाही.

संबंधित बातम्या

दिल्लीनंतर महाराष्ट्रात विजेचे संकट गडद, कोळशाअभावी 13 युनिट बंद

Power crisis on the head of Maharashtra including Mumbai, MSEDCL says, reduce power consumption in the morning and evening, read the current situation!