मंत्री गणेश नाईक सांत्वनासाठी गेले अन् पूर्णेकरांच्या घरात ‘ती’ महिला शिरली; पोलिसांना बोलावलं अन् पुढे….
प्रदीप पूर्णेकर कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी मंत्री गणेश नाईक त्यांच्या घरी आले असताना एक अज्ञात महिला घरात शिरल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी तिला ताब्यात घेत तिची चौकशी केली आहे.

प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी मंत्री गणेश नाईक त्यांच्या घरी आले असताना एक अज्ञात महिला घरात शिरल्याची घटना समोर आली. संबंधित महिला घरातील व्यक्तींचे फोटो आणि व्हिडिओ काढत असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच ती व्हॉइस कॉलद्वारे कोणाशी तरी संवाद साधत असल्याचेही सांगण्यात आले. या प्रकाराची माहिती मिळताच कापूरबावडी पोलिसांनी तात्काळ महिलेला ताब्यात घेतले.
घरातील व्यक्तींनी विचारला नाव-पत्ता
घरातील व्यक्तींनी संबंधित महिलेकडे तिचे नाव आणि पत्ता विचारला. मात्र, तिने उलट घरातील सदस्यांकडेच त्यांची ओळख आणि आधारकार्ड मागितल्याचे समोर आले. त्यामुळे घरातील व्यक्तींना संशय आला आणि याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच कापूरबावडी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून संबंधित महिलेला ताब्यात घेतले. पोलिसांनी तिचा मोबाईल फोनही ताब्यात घेतला. या महिलेच्या मोबाईलची तपासणी करण्यात आली.
चौकशीनंतर महिलेला सोडले
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेची चौकशी केल्यानंतर तिला सोडून देण्यात आले आहे. ही महिला सध्या दादर येथे राहत असून काही वर्षांपूर्वी ती मानपाडा येथील गणेश नगर परिसरात राहत होती. पोलिसांच्या माहितीनुसार, पूर्णेकर यांच्या घराबाहेर मोठी गर्दी दिसल्याने ही महिला त्या घरात गेली होती. तिच्या मोबाईलमध्येही आक्षेपार्ह असे काही आढळून आलेले नाही. त्यामुळे चौकशी केल्यानंतर महिलेला सोडण्यात आल्याची माहिती कापूरबावडी पोलीस स्थानकाने दिली आहे.
