Rohit Pawar: आम्ही तोंड उघडलं तर पळता भुई थोडी होईल; भाजपच्या बड्या नेत्याचा रोहित पवारांना थेट इशारा, म्हणाले- नावातील पवार काढलं तर…
Pravin Darekar Slams Rohit Pawar Over Allegations: अजितदादांचा एवढाच कळवळा होता तर पुतळ्याच्या अनावरणाला जायला हवं होतं, असं म्हणत रोहित पवारांना टोला लगावला आहे.

अजित पवार यांच्या विमान अपघात आणि मृत्यू प्रकरणावरून आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. रोहित पवारांकडून सातत्याने करण्यात येणाऱ्या आरोपांना भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. रोहित पवारांच्या आरोपांमध्ये तथ्य असायला हवं. केवळ प्रसिद्धीसाठी आणि राजकारणासाठी कोणत्याही थराला जाण्याचं विरोधकांचं धोरण असल्याचा आरोप दरेकर यांनी केला.
या प्रकरणात रोहित पवार यांनाच चौकशीसाठी बोलवायला हवं, अशी मागणीही त्यांनी केली. प्रवीण दरेकर म्हणाले, रोहित पवारांच्या डोक्यात प्रसिद्धीचा हव्यास आणि मस्ती इतक्या लवकर जाईल, असं आम्हाला वाटलं नव्हतं. त्यांनी आरोपांचा अतिरेक केला आहे. शरद पवार यांचे नातू असूनही ते आपल्या राजकीय परंपरेला मातीमोल करत आहेत. रोहित पवारांना संदर्भहीन बोलण्याची सवय झाली आहे. आरोप करायला अक्कल लागते, केवळ बोलायला काय लागतं, असा टोला त्यांनी लगावला.
रोहित पवार यांनी दाखवलेल्या विमानाशी संबंधित फोटो आणि आरोपांवरही दरेकर यांनी आक्षेप घेतला. संबंधित कंपनी अनेकांना विमानसेवा पुरवत असते. अशा परिस्थितीत केवळ एक फोटो दाखवून आरोप करणं योग्य नाही. उद्या मीसुद्धा कोणावरही आरोप करू शकतो; मात्र त्या आरोपांमध्ये तथ्य असणं महत्त्वाचं आहे, असं दरेकर म्हणाले. रोहित पवारांनी केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी आणि त्यांनाही चौकशीसाठी बोलवावं. त्यातून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी दरेकर यांनी रोहित पवारांवर वैयक्तिक टीकाही केली. त्यांच्या आरोपांमागे राजकीय हेतू असल्याचा दावा करत त्यांनी रोहित पवारांच्या विधानांचा निषेध आणि धिक्कार केला. ‘उद्या आम्ही तोंड उघडलं तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल,’ असा इशाराही त्यांनी दिला. अजितदादांबद्दल खरोखरच कळवळा होता, तर त्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला उपस्थित राहायला हवं होतं, असं म्हणत रोहित पवारांच्या अनुपस्थितीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. मात्र, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या कार्यक्रमाला का उपस्थित नव्हते, याची माहिती आपल्याला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार यांनी विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर दरेकर यांनी पोलिसांना विनंती करत या प्रकरणात रोहित पवार यांचीही चौकशी करण्याची मागणी केली. अजितदादा हे राज्यातील महत्त्वाचे नेते होते. त्यांच्या मृत्यू प्रकरणात कोणत्याही प्रकारचा संभ्रम राहू नये, मात्र आरोप करताना त्यामागे ठोस आधार असायला हवा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरूनही प्रवीण दरेकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी डिलिमिटेशनबाबत भूमिका मांडण्यापूर्वी शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची भूमिका काय आहे, हे तपासून पाहावं, असा सल्ला दरेकर यांनी दिला. डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीतील एका जबाबदार नेत्याने भूमिका मांडली आहे. मात्र, या विषयावर काँग्रेसने स्वतःचा इतिहासही तपासावा. काँग्रेसच्या काळातही अशा प्रकारच्या प्रक्रिया झाल्या होत्या, असं सांगत दरेकर यांनी सपकाळ यांना काँग्रेसचा इतिहास पाहण्याचा टोला लगावला.
याशिवाय एका प्रकल्पाच्या संदर्भात बोलताना दरेकर यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्रीवर बैठक घेऊन काही निर्णय घेतले होते. त्या निर्णयांबाबत काही संभ्रम निर्माण झाले होते. त्यामुळे त्याचा पाठपुरावा करण्यात आला. संबंधित प्रकल्पासाठी तब्बल नऊ वेळा टेंडर काढण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. भाड्याच्या मुद्द्यावरून काही मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालणार असल्याचं दरेकर यांनी स्पष्ट केलं.
अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणावरून रोहित पवार आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये सुरू असलेला संघर्ष आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. चौकशीची मागणी, विमान अपघाताबाबत उपस्थित केलेले प्रश्न, पुतळा अनावरण कार्यक्रमातील अनुपस्थिती आणि डिलिमिटेशनचा मुद्दा अशा विविध विषयांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. प्रवीण दरेकर यांच्या आक्रमक प्रतिक्रियेमुळे या वादात आता आणखी भर पडली आहे.
