
मराठा समाजाला कुणबी असल्याचे प्रमाणपत्र मिळत आहे. सरकारच्या जीआरनंतर या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. दरम्यान, आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणावर महत्त्वाचे भाष्य केले आहे. आज धर्म नव्हे तर ओबीसी धोक्यात आहेत. ओबीसी सत्ताधारी झाल्याशिवाय आरक्षण वाचणार नाही. ओबीसींच्या राजकीय लढ्याला सुरुवात झाली आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
प्रकाश आंबेडकर जालन्यात जाहीर सभेत बोलत होते. या सभेत बोलताना त्यांनी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण यावर भाष्य केले. जरांगे मुंबईत ठिय्या मांडून बसले आणि काँग्रेस, बीजेपी, शिंदे, राष्ट्रवादीचे 190 आमदार आमदार जरांगे यांच्या दर्शनाला गेले. हेच आमदार देवेंद्र फडणीस यांना भेटले तशी फडणवीस यांची भाषा बदलली. याच आमदारांनी जरांगे काय म्हणतात ते ऐकण्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांना सल्ला दिला आणि कुणबी प्रमाणपत्राचा जीआर निघाला, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसेच देवेंद्र फडणवीस 2 सप्टेंबर रोजीचा GR रद्द करणार आहेत का? असा सवालही त्यांनी केला.
ओबीसीच्या राजकीय लढाईला सुरवात झाली आहे. ओबीसींनी मोठ्या प्रमाणात आपले उमेदवार जाहीर केले पाहिजेत. प्रत्येक मतदारसंघामध्ये एक तरी ओबीसी मतदार असायला हवा. काही मतदारसंघ एससी प्रवर्गासाठी राखीव आहेत. काही मतदारसंघ एसटीसाठी राखीव आहेत. एसी आणि एसटी हा वर्ग आरक्षणवादी आहे. हे लक्षात घ्यायला हवे. जे लोक आरक्षणवादी आहेत, त्यांनाच मतदान करायला हवं. आपल मत हे ओबीसीला, आपलं मत हे एसटीला असायला हवे, असेही यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले.
धर्म नाही तर ओबीसी संकटात आला आहे. ओबीसी सत्ताधारी झाल्याशिवाय आरक्षण वाचणार नाही. ओबीसी नेत्यांच्या नाड्या तिसऱ्याच्या हातामध्ये आहेत. कळसुत्री बाहुल्याप्रमाणे हे ओबीसी नेते नाचवलं जात आहेत, असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी ओबीसींनी राजकारणात उतरावे, असे आवाहन केले आहे. दरम्यान, आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी ही भूमिका घेतली आहे. त्यामुळे ते ओबीसींची मोट घडवून आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. याचे भविष्यात काय परिणाम दिसणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.