
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. मुंबईच्या वरळी डोम येथे आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अजूनही भारतरत्न का देण्यात आला नाही? असा प्रश्नही त्यांना यावेळी विचारण्यात आला, या प्रश्नाला उत्तर देताना ‘त्यांनी मोठं विधान केलं आहे. सावरकर लाखो करोडो हृदयाचे सम्राट बनले आहेत. त्या समितीत मी नाही, जर कोणी त्या समितीमधलं मला भेटलं तर त्यांना मी नक्की विचारेन’ असं मोहन भागवत यांनी म्हटलं होतं. दरम्यान त्यानंतर आता मोहन भागवत यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाले आंबेडकर?
दुर्दैवाने मी असं म्हणेल की, सावरकरांवरील माझा लेख हा मोहन भागवत यांनी वाचलेला नाही, सावरकरांच्या दोन भूमिका आहेत, एक क्रांतीकारी सावरकर आणि एक ब्रिटिशांना मदत करणारे सावरकर, त्यामुळे अशा व्यक्तीला ज्यांनी ब्रिटिशांना मदत केली, आणि पत्री सरकार जे शेवटपर्यंत महाराष्ट्रात लढत होतं, या पत्री सरकारमधील लोकांना पकडून देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते हिंदू महासभेनं केलं आहे. तेव्हा एक विधान करण्यात आलं होतं की, हे आम्ही आमच्या प्रमुखांच्या सांगण्यावरून करतोय. मी असं म्हणेल की अटक होण्यापूर्वी सावरकर हे क्रांतीवीर होते. हे सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे असं मी म्हणेल.
पण जेलमधून सुटल्यानंतर सावरकरांची जी संघटना होती, हिंदू महासभा त्यांनी पत्री सरकार उदाहरण म्हणून दोतोय, त्यांनी पत्री सरकारमधील लोकांना पकडून देण्याचं काम केलं, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये असे उदाहरण आपल्याला आजही पहायला मिळतात. पत्री सरकारमधील लढावय्यांच्या कुटुंबाला पकडून देणारे सावरकर समर्थक होते, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अशा व्यक्तीला भारतरत्न दिला जावा असं मी मानत नाही, असं यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.