
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मतचोरीच्या मुद्द्यावरून निवडणूक आयुक्तांच्या भेटीला जाण्यापूर्वीच त्यांच्यावर मनसेचे माजी नेते प्रकाश महाजन यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. महाजन यांनी पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. मनाप्रमाणे निकाल लागला नाही तर मतचोरी असते. आणि पराभव झाला की निवडणूक आयोग वाईट असतो. अशी काही राजकीय पक्षांची धारणा झाली आहे, अशी खरमरीत टीका प्रकाश महाजन यांनी केली आहे. प्रकाश महाजन हे मीडियाशी संवाद साधत होते.
मनाप्रमाणे निकाल नाही लागला, आपला पराभव झाला, आपण सत्तेतून बाहेर पडलो की निवडणूक आयोग वाईट असतो. ही धारणा राजकीय पक्षांची झालेली आहे. मतचोरी किती असते? आरोप करणारे मतचोरीबाबत दहा माणसं सुद्धा कोर्टात उभे करू शकले नाहीत. राहुल गांधींनी तर मतचोरीचा आरोप केला. त्यानंतर ते कोलंबियात निघून गेले, असा टोलाच प्रकाश महाजन यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे लगावला आहे.
काँग्रेससोबत गेल्यास वाईट…
राज ठाकरे हे काँग्रेससोबत जाणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यावरही प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राज ठाकरे काँग्रेस सोबत गेल्यास मला व्यक्तीश: वाईट वाटेल. आम्ही काँग्रेसकडून जे भोगलंय, त्यामुळे वाईट वाटेल. राज ठाकरेंच्या हिंदुत्व विषयीच्या कल्पना, मराठी माणसांविषयीच्या कल्पना याला काँग्रेसमध्ये फारसा वाव नाही, असं महाजन म्हणाले.
गुंडच राजकारणी पाळत आहेत
निलेश घायवळ प्रकरणावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या प्रकरणात रामदास कदम हे एकनाथ शिंदेंकडे बोट दाखवत आहेत. पूर्वीच्याकाळी राजकारणी लोक गुंडं पाळत होते. मात्र आता परिस्थिती अशी आली आहे की, गुंड लोकच राजकारणी पाळायला लागले आहेत. काही ठिकाणी गुंडांनी डीपीडीसी चालवली. जिल्हा चालवला. अब्जावधी रुपयांची माया जमा केली (बीड जिल्हा आणि धनंजय मुंडे बाबत) बीडबद्दल न बोलायला काय झालं? जे दिसल लोकांना, ते मला दिसलं. स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी जो इशारा दिला होता, तो ऐकला असता तर ही वेळ आली नसती. धनंजय मुंडेंवर ही वेळ आली नसती, असं त्यांनी सांगितलं. संत भगवान बाबाच्या भूमीत दसऱ्याच्या मेळाव्यात ते फोटो लावले जातात. किती दुर्दैवाची गोष्ट आहे? पोलीस स्टेशन मध्ये अडकवायचं यांनीच आणि मदत करायची यांनीच असा दानशूरपणा दाखवायचं सुरू होतं, असा हल्लाही त्यांनी केला.
कारखान्याची माहिती नाही
पंकजा मुंडे यांनी त्यांचा साखर कारखाना विकल्याची चर्चा आहे. त्यावर महाजन यांनी स्पष्टच मत मांडलं. पंकजा मुंडे यांनी साखर कारखाना विकल्याबाबतची मला माहिती नाही. मी त्या कारखान्यात कधी गेलो नाही. त्या कारखान्याचा गेट कोणत्या दिशेला आहे, हे सुद्धा मला माहीत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं