प्रसव वेदनेने जीव कंठाशी! रस्त्यातील खड्ड्यांनी केला घात, भिवंडीत महिलेसोबत घडलं असं काही की…

Bhiwandi Roads : भिवंडी शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांचे हाल होत असतानाच प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

प्रसव वेदनेने जीव कंठाशी! रस्त्यातील खड्ड्यांनी केला घात, भिवंडीत महिलेसोबत घडलं असं काही की...
Bhiwandi Pregnunt Woman
Image Credit source: Google
बापू गायकवाड | Updated on: Aug 05, 2026 | 9:39 PM

राज्यातील अनेक भागातील रस्त्यांची दुरावस्था सध्या चर्चेचा विषय बनलेली आहे. अशातच भिवंडी शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांचे हाल होत असतानाच प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसूती वेदना सुरू झालेल्या गर्भवती महिलेला रुग्णालयात नेत असताना रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे प्रवास लांबला आणि अखेर कल्याण नाका परिसरात रिक्षामध्येच महिलेची प्रसूती झाली. सुदैवाने आई आणि नवजात बाळाची प्रकृती स्थिर असून या घटनेने शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

गर्भवती महिलेची रिक्षात प्रसूती

समोर आलेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील अजमेर नगर परिसरात राहणाऱ्या वर्षा कमलेश यादव यांना प्रसूतीच्या कळा सुरू झाल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने रिक्षातून तिला प्रसूती साठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात घेऊन निघाले. मात्र शहरातील रस्त्यां वर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यां मुळे रिक्षाला अत्यंत संथ गतीने प्रवास करावा लागला. अवघ्या पाच ते दहा मिनिटांत पूर्ण होणारा प्रवास तब्बल अर्धा ते पाऊण तास चालला.

आई आणि बाळ सुखरूप

रस्त्यातील धक्के आणि खड्ड्यांमुळे प्रसूती वेदना तीव्र झाल्याने कल्याण नाका परिसरात रिक्षामध्येच वर्षा यादव यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यानंतर तातडीने आई आणि नवजात बाळाला भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. या घटनेमुळे भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातील रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे.

रस्ते दुरूस्ती करण्याची नागरिकांची मागणी

ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यां मुळे नागरिकांना रोजच जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अपघात, वाहतूक कोंडी आणि आता रुग्णालयात पोहोचण्या पूर्वी रिक्षातच झालेली प्रसूती या घटनांमुळे प्रशासनाच्या दुर्लक्षावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून खड्डेमुक्त भिवंडी करण्याची मागणी केली असून, आणखी एखादी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us