शिंदे गटाचं ऑपरेशन टायगर, रायगडमध्ये अख्खं गावच फोडलं, कुणाचं टेन्शन वाढलं?

रायगडमध्ये पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर राबवण्यात आलं आहे, यावेळी अनेकांनी गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला.

शिंदे गटाचं ऑपरेशन टायगर, रायगडमध्ये अख्खं गावच फोडलं, कुणाचं टेन्शन वाढलं?
| Edited By: | Updated on: Jun 28, 2025 | 10:18 AM

राज वैशंपायन, प्रतिनिधी : रायगडमध्ये पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरचा प्रभाव दिसून आला आहे. महाड तालुक्यातील मोहोप्रे गावात जवळपास 700 ते 800  ग्रामस्थांनी आज मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

हा रायगड जिल्ह्यातील मोठा पक्षप्रवेश सोहळा मानला जात असून, मंत्री भरत गोगावले यांनी या पक्ष प्रवेश सोहळ्याचे कौतुक केलं आहे. जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत यांनी हा पक्ष प्रवेश सोहळा घडवून आणला आहे. दरम्यान एकीकडे रायगडमध्ये राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे मोर्चे बांधणीत व्यग्र असताना, दुसरीकडे भरत गोगावले हे देखील जिल्ह्यात आपली ताकद वाढवण्याच्या तयारीत असल्याचं स्पष्ट चित्र आजच्या पक्ष प्रवेश सोहळ्यातून दिसून आलं आहे.

गोगावले यांनी काय म्हटलं? 

रायगडमध्ये ऑपरेशन टायगर अंतर्गत हा मोठा पक्ष प्रवेश सोहळा आहे.  आजच्या पक्ष प्रवेशामुळे मला नवी ऊर्जा मिळाली आहे,  विरोधक आता दहा वेळा माझ्यासमोर उभं राहताना विचार करतील, असं यावेळी मंत्री गोगावले यांनी म्हटलं.

दरम्यान राज्यात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर वातावरण चांगलंच तापलं आहे. पाच जुलै रोजी याविरोधात मुंबईमध्ये भव्य मोर्चा निघणार आहे, या मोर्चामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे दोघेही बंधू सहभागी होणार आहेत. मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, त्याचा महायुतीला फटका बसणार का? या प्रश्नाला देखील गोगावले यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

आतापर्यंत तरी असं काहीच वाटलं नाही, कारण अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमच्या पक्षात येत आहेत, त्यामुळे दोन्ही भावांना एकत्र येणं क्रमप्राप्त वाटत असेल, मात्र आम्हाला कोणतीच अडचण भासणार नाही, फरक पडणार नाही, असं वक्तव्य यावेळी गोगावले यांनी केलं आहे.

दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची देखील चर्चा सुरू आहे, यावर देखील गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘शरद पवार यांच्या मनातलं आणि ध्यानातलं आतापर्यंत कोणीच सांगू शकलेलं नाही,  त्यामुळे त्यांच्या निर्णयावर मी बोलणं योग्य वाटत नाही, असं गोगावले यांनी म्हटलं आहे.