NEET चा निकाल जाहीर होण्यापूर्वीच विद्यार्थिनीला पैकीच्या पैकी गुण मिळाल्याची जाहिरात, नांदेडमधील धक्कादायक प्रकार

नांदेडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ती म्हणजे नीट परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच एका खासगी क्लासेसने आपल्या विद्यार्थिनीला केमेस्ट्री विषयात पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत, अशी जाहिरातबाजी केली आहे.

NEET चा निकाल जाहीर होण्यापूर्वीच विद्यार्थिनीला पैकीच्या पैकी गुण मिळाल्याची जाहिरात, नांदेडमधील धक्कादायक प्रकार
NEET paper
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 17, 2026 | 10:07 PM

नीट परीक्षा वैद्यकीय क्षेत्रासाठी अत्यंत  महत्त्वाची मानली जाते. मात्र नीट परीक्षेला पेपरफुटीचं ग्रहण लागलं आहे. नीट परीक्षेचे पेपर लीक झाल्याचं लक्षात येताच सरकारने ही परीक्षाच रद्द केली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करत आहे. दरम्यान नांदेडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तो म्हणजे नीट परीक्षेच्या निकालापूर्वीच नांदेडमधील एका खासगी कोचिंग क्लासेसकडून विद्यार्थिनीला 180 पैकी 180 गुण मिळाल्याची जाहिरात करण्यात आली होती, आता या जाहिरातीमुळे हे कोचिंग क्लासेस सीबीआयच्या रडारवर येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या कोंचिग क्लासेसने जाहिरातीच्या पोस्टरवर ज्या विद्यार्थिनीचं नाव छापलं होतं, तिच्या वडिलांची यापूर्वीच नीट पेपर फुटीप्रकरणात सीबीयाकडून चौकशी करण्यात आली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  नांदेडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये स्पर्धा सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. या स्पर्धेतून आपले विदयार्थी कसे गुणवंत आहेत याची जाहिरातबाजी निकालापूर्वीच केली जात आहे. मात्र नांदेड मधील एका खासगी कोचिंग क्लासेसला अशी जाहिरात करणं महागात पडण्याची शक्यता आहे.

नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयच्या पथकाने शनिवारी नांदेडमध्ये कदम कुटुंबाची चौकशी केली होती. पाच लाख रुपयांत आपल्या मुलीसाठी तिच्या वडीलांनी नीटचा पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे. याच मुलीचा फोटो छापून नांदेडमधील एका खासगी कोचिंग क्लासेसने जाहिरातबाजी केल्याचे उघड झाले आहे. चौकशी करण्यात आलेल्या मुलीला केमिस्ट्री या विषयात 180 पैकी 180 गुण मिळाल्याची ही जाहिरात आहे. विशेष म्हणजे नीट परीक्षेचा निकाल येण्यापूर्वीच संबधित क्लासेसने असे भाकीत वर्तवलं आहे. अन्य दोन विद्यार्थिनीचे फोटो देखील जाहिरातीत छापन्यात आले आहेत. सध्या ही जाहिरात समाज माध्यमावर व्हायरल होतेय. या जाहिरातबाजीमुळे संबधित कोचिंग क्लासेस चालक तपास यांत्रनेच्या रडारवर येण्याची शक्यता आहे.

पालक, विद्यार्थ्यांमध्ये संताप  

दरम्यान नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. दोषींवर कडक करावाई व्हावी अशी मागणी होत आहे.

Follow Us