त्याला मामा म्हणायचे, पण… अशोक खरातच्या अटकेनंतर आता पुण्यातील भोंदू बाबा रडारवर, शिवदत्त आश्रमाचं बिंग फुटलं
पुण्याच्या खेड तालुक्यातील चांडोली येथील शिवदत्त आश्रमात अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या नवनाथ गवळीवर गुन्हा दाखल झाला असून या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.

सध्या राज्यात आध्यात्मिक गुरुच्या नावाखाली सर्वसामान्य भाविकांची फसवणूक करणाऱ्या अशोक खरात या भोंदू बाबाची सातत्याने चर्चा सुरु आहे. त्यातच आता पुण्यातील खेड तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. चांडोली येथील शिवदत्त आश्रमात अध्यात्माचा बुरखा पांघरून महिलांचे शोषण करणाऱ्या एका भोंदू बाबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ पंढरीनाथ गवळी असे या भोंदू बाबाचे नाव असून त्याच्या विरोधात राजगुरुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊनही आरोपी अद्याप मोकाट असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
नेमके प्रकरण काय?
पुण्यातील चांडोली परिसरात नवनाथ गवळी हा स्वतःला महाराज म्हणवून घेत शिवदत्त आश्रम चालवतो. परिसरात त्याला मामा या नावाने संबोधले जाते. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, या आश्रमात दोष निवारण करण्याच्या बहाण्याने महिलांना बोलावले जाते. मी जेव्हा आश्रमात गेली, तेव्हा आरोपी गवळीने तिच्यासोबत अश्लील चाळे करून विनयभंग केला. इतकेच नव्हे तर, अध्यात्माच्या नावाखाली शारीरिक संबंधांची मागणी करून मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोपही पीडितेने केला आहे.
पतीने दिला आधार, मग फुटलं वाचा
सुरुवातीला आरोपीच्या भीतीपोटी पीडितेने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र, आरोपीचा त्रास वाढल्याने तिने धाडस करून आपल्या पतीला सर्व हकीकत सांगितली. पतीने तिला पूर्ण पाठिंबा देत पोलीस तक्रार करण्यास प्रवृत्त केले. पीडितेच्या तक्रारीनंतर राजगुरुनगर पोलिसांनी तातडीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ज्या पद्धतीने माझ्यासोबत अश्लील प्रकार करण्याचा प्रयत्न झाला, तसा तो इतर कोणत्याही महिलेसोबत होऊ नये. या भोंदू बाबावर कडक न्यायालयीन कारवाई झालीच पाहिजे. गुन्हा दाखल होऊनही तो अजून बाहेर कसा?, असा सवाल पीडित महिलेने उपस्थित केला आहे.
पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह
दरम्यान एकीकडे भोंदू बाबांविरोधात कडक कायदे असताना दुसरीकडे राजगुरुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होऊनही आरोपी अद्याप फरार आहे. आरोपीला अटक करण्यास विलंब होत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर स्थानिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.