
काही दिवसांपूर्वी पुण्याच्या कोथरूड परिसरामध्ये गोळीबाराची घटना घडली होती. एका तरुणावर गोळीबार करण्यात आला होता, विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ही घटना घडली ते ठिकाण पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर आहे. या घटनेनंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत, गुंड निलेश घायवळ याच्यासह दहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीविरोधी कायदा मकोका अंतर्गत कारवाई केली. गुन्हा दाखल होताच निलेश घायवळ फरार झाला, तो लंडनला पळून गेल्याची माहिती समोर येत आहे.
मात्र आता मकोका अंतर्गत कारवाई झालेली असताना देखील निलेश घायवळ याला पासपोर्ट कसा मिळाला? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पुण्यात त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे त्याला पुण्यातून पासपोर्ट मिळाला नसता, त्यामुळे त्याने पासपोर्ट काढण्यासाठी अहिल्यानगरमधून अर्ज केला, त्याने अर्जावर अहिल्यानगर येथील चुकीचा पत्ता दिल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. ही घटना समोर आल्यानंतर अहिल्यानगर पोलिसांकडून मोठा खुलासा करण्यात आला होता, निलेश घायवळने जो पत्ता दिला होता, त्या पत्त्यावर आम्ही जाऊन आलो मात्र तो तिथे आढळला नाही, त्यामुळे आम्ही निलेश घायवळ आढळला नाही, निलेश घायवळ नो फाउंड असा शेरा देखील दिला होता, असा दावा या प्रकरणात पोलिसांनी केला आहे.
दरम्यान आता निलेश घायवळचे कागदपत्रं डिलिव्हरी कसे झाले? याविषयी पोलीस पोस्ट ऑफिस कार्यालयात चौकशी आणि तपास करणार आहेत. पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी वापरण्यात आलेले कागदपत्रं पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहेत. यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे निलेश घायवळ याने दोन आधार कार्ड तयार केल्याचं समोर आलं आहे. एक आधार कार्ड पुणे कोथरूडचे आहे तर दुसरे आधार कार्ड गौर घुमनट अहिल्यानगर येथील आहे. निलेश घायवळने जे आधार कार्ड पासपोर्ट बनवण्यासाठी दिलं होतं, त्यावर त्याने त्याचं नाव देखील बदललेलं आहे. घायवळ ऐवजी त्याने आपलं नाव त्या आधार कार्डवर गायवळ असं केलं आहे. घ च्या ऐवजी ग चा वापर करून त्याने बनावट आधार कार्डच्या आधारे पासपोर्ट काढल्याचं समोर आलं आहे.