पुण्यातील जैन हॉस्टेल वाद विकोपाला, बिल्डरची गाडी, महापौर.. रविंद्र धंगेकरांच्या नव्या आरोपाने खळबळ

पुण्यातील जैन हॉस्टेल खरेदी प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना नेते रविंद्र धंगेकर यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महापौर असताना मोहोळ यांनी बिल्डरची खाजगी गाडी वापरल्याचा दावा धंगेकरांनी केला.

पुण्यातील जैन हॉस्टेल वाद विकोपाला, बिल्डरची गाडी, महापौर.. रविंद्र धंगेकरांच्या नव्या आरोपाने खळबळ
Updated on: Oct 24, 2025 | 9:11 AM

गेल्या काही दिवसांपासून जैन हॉस्टेल खरेदी प्रकरणावरून पुण्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर हे सातत्याने केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप करताना दिसत आहेत. मुरलीधर मोहोळ हे महापौर असताना मनपाची अधिकृत गाडी न वापरता एका बिल्डरची गाडी वापरत होते, असा दावा रविंद्र धंगेकर यांनी केला. यासोबतच त्यांनी या गाडीचे फोटो आणि नंबरदेखील सांगितला आहे. बिल्डरच्या गाडीला महापौराचा लोगो कसा? असा सवाल रविंद्र धंगेकर यांनी उपस्थित केला आहे.

तुमचे स्वतःचे काही कर्तृत्व नाही

रविंद्र धंगेकर यांनी नुकतंच टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली. मी भाजप पक्षाच्या विरोधात नाही, पण जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये शासकीय यंत्रणा धाब्यावर बसवून कशी हस्तगत केली, यावर मी बोलतोय. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचा यात हात आहे आणि ते यावर खुलासा करायला तयार नाहीत. मुरलीधर मोहोळ यांच्या नावाच्या बाजूचे कमळ हटवले, तर त्यांना कोणीही विचारणार नाही. तुम्ही फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर निवडून येता, तुमचे स्वतःचे काही कर्तृत्व नाही, असा घणाघात रविंद्र धंगेकर यांनी केला.

सर्व अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करा

महापौर असताना मुरलीधर मोहोळ यांनी शासकीय यंत्रणा बिल्डरांच्या दारात गहाण ठेवली. मोहोळ हे महापौर असताना मनपाची गाडी वापरत नव्हते. तर एका बिल्डरची खासगी गाडी वापरत होते. इतकंच नाही, तर त्यांनी त्या गाडीचे फोटो आणि नंबरही जाहीर करत बिल्डरच्या गाडीला महापौराचा लोगो कसा? असा थेट धंगेकरांनी केला आहे. याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे आणि मुरलीधर मोहोळ यांच्यासह यात सहभागी असलेल्या सर्व अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी धंगेकर यांनी केली.

मला शिव्या देऊ नका

पुण्यात ‘अड्डेवाले, गुत्तेवाले’ एकत्र येऊन शहर ओरबडत आहेत. त्यांच्या विरोधात बोलणारे ताडीवाले, माडीवाले, पत्तेवाले, गुत्तेवाले हे सगळे एकत्र येऊन पक्षाच्या नावाखाली लोकांना लुटत आहेत, अशी खळबळजनक टीकाही त्यांनी केली. तिकडे धर्मवीरांची संख्या जास्त असून देखील जैन मंदिरावर का बोलत नाहीत? असा प्रश्न धंगेकर यांनी केला आहे. यावेळी त्यांनी रमेश पाटलांचा फोन आल्याचा किस्साही सांगितला. मी त्यांना म्हटलं तुम्ही सगळ्यांना शिव्या देता, मी माफी मागतो मला शिव्या देऊ नका. त्यावर ते तिकडून आय लव यू! म्हणाले.