पुणे जिल्ह्यातल्या गरोदर मातांना मिळणार ‘बाळंत विडा’, राज्यातही होऊन जाऊ द्या !

| Updated on: Jan 31, 2021 | 9:58 AM

पुणे जिल्ह्यातील स्थानिक प्रशासन गरोदर माता आणि बाळाचे आरोग्य लक्षात घेऊन 'बाळंत विडा' नावाचा अनोखा उपक्रम राबवणार आहे. (pregnant women Balant Wida)

पुणे जिल्ह्यातल्या गरोदर मातांना मिळणार बाळंत विडा, राज्यातही होऊन जाऊ द्या !
Follow us on

पुणे : गरोदर महिला आणि जन्माला येणाऱ्या बाळाचे आरोग्य़ चांगले राहण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवण्यात येतात. पुणे जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनसुद्धा गरोदर माता आणि बाळाचे आरोग्य लक्षात घेऊन ‘बाळंत विडा’ नावाचा अनोखा उपक्रम राबवणार आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. महिलांचे आरोग्य आणि बालकांचे कुपोषण कमी करणे हा या योजनेमागचा मुख्य हेतू आहे. (Pune jilha parisha will give Nutritious diet to pregnant women through Balant Wida)

बाळंत विडा काय आहे?

गरोदर महिला आणि बाळाचे आरोग्य लक्षात घेता राज्य सरकारने वेळोवेळी अनेक योजना राबवलेल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी येथील प्रशासनाने राज्य सरकारचे अनेक प्रकल्प हिरिरिने राबवले आहेत. त्यांनतर आता येथे बाळंत विडा नावाची कीट गरोदर महिलांना देऊन त्यांच्या आहाराची काळजी घेतली जाणार आहे. प्रसुतीच्या उंबरठ्यावर असेल्या गरोदर महिला तसेच स्तनदा मातांना या बाळंत विडा कीटच्या माध्यमातून सकस आणि पौष्टिक आहार देण्यात येणार आहे. बाळंत विडा या कीटच्या माध्यमातून प्रसुतीच्या उंबरठ्यावर असलेल्या आणि स्तनदा मातांना काळी खारिक, सेंद्रिय गूळ, काजू, शुध्द गाईचे तुप असा पौष्टिक आहार पुरवला जाणार आहे.

प्रशासनाकडून 1 कोटी 25 लाखांचा निधी राखीव

हा उपक्रम पुणे जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागामार्फत राबवला जात आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्व तयारी झाली असून या नव्या योजनेची लवकरच अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी दिली आहे. या योजनेसाठी येथील जिल्हा परिषदेने तब्बल 1 कोटी 25 लाखांचा निधी राखीव ठेवला आहे. त्यातील सर्वसाधारण गटातील महिलांसाठी 75 लाख रुपये तर मागासवर्गीय गटातील महिलांसाठी 50 लाख रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात येणार आहे.

राज्यातही योजनेचा विस्तार करा

नंदुरबारसारख्या जिल्ह्यात स्थलांतर आणि लहान मुलांच्या कुपोषणाचा गंभीर प्रश्न आहे. नंदुरबारमधील हजारो कुटुंब रोजगारासाठी गुजरात राज्यात स्थलांतर करतात. या कुटुंबासोबत त्यांची लहान मुले जातात. स्थलांतरामुळे लहान मुले अंगणवाडीतून दिल्या जाणाऱ्या पोषण आहारापासून वंचित राहतात. परिणामी या भागात कुपोषणाचे प्रामाण लक्षणीयरित्या वाढलेले आहे. 24 जानेवारीपर्यंत नंदुरबार जिल्ह्यातून 1 हजार 369 बालकांनी स्थलांतर केल्याचं समोर आलं आहे. स्थलांतरित बालकं आणि गरोदर माता यांच्या आरोग्याचा, पोषणाचा प्रश्न या भागात गंभीर आहे. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेकडून राबवली जात असलेली ही बाळंत विडा कीट सारखी योजना कुपोषणासारख्या गंभीर प्रश्नाशी दोन हात करण्यासाठी मदत करु शकेल, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. बाळंत विडा कीटच्या माध्यमातून दिला जाणारा सकस आहार राज्यातील संपूर्ण महिलांना मिळाला तर त्याचा फायदा नक्कीच होईल अशी असे आरोग्य आणि महिलांच्या प्रश्नांसर्भात काम करणाऱ्या संस्था आणि तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. ‘बाळंत विडा’सारखी योजना राज्यभर राबवावी अशी मागणी केली जात आहे.

संबंधित बातम्या :

स्तुत्य ! कुष्ठरोग्यांच्या भल्यासाठी केडीएमसी आयुक्तांचं एक पाऊल पुढे, कुष्ठरोगी महिलांना रोजगार देणार

Myntra Logo Change : काय मिंत्राचा लोगो महिलांचा अपमान करतो? एका महिलेच्या तक्रारीनंतर कंपनीनं लोगो बदलला, नेटीझन्समध्येही वाद

 (Pune jilha parisha will give Nutritious diet to pregnant women through Balant Wida)