मोठी बातमी! MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता कोर्टात आव्हान; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल, दावा काय?
पुण्यातील MPSC आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढणार असल्याचे समोर आले आहे.

पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. याबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या आंदोलनामुळे पुण्यातील नागरिकांना त्रास होत असल्याचा दावा या याचिकेत केला आहे. यामुळे आता आंदोलनकर्त्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढणार आहेत. तसेच या प्रकरणी कोर्टाकडून राज्य सरकारसह, पोलीस आणि आयोजकांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून एमपीएससीचे विद्यार्थ्यी पुण्यात आंदोलन करत आहेत. एमपीएससीचे अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी त्यांनी आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. यासाठी आमदार रोहित पवारही मैदानात उतरले आहेत. ते विद्यार्थ्यांसोबत लढा देत आहेत. आज पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी रोहित पवारांच्या नेतृत्वात तिरडी आंदोलन काढण्यात आले आहे. सरकारविरोधात तिरडी आंदोलन करण्यात आले.
यानंतर आता एमपीएससी विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढणार आहे. मुंबई हायकोर्टात या आंदोलनाविरोधात याचिका दाखल केली आहे. या आंदोलनामुळे पुणेकरांना त्रास होत असल्याचे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे. यामुळे आता एमपीएससी विद्यार्थ्यांना कोर्टात आव्हान मिळाले आहे. त्यांच्या अडचणीत अजून वाढ झाल्याचे दिसून येत आहे. स्वत:च्या भविष्याच्या लढाईसोबतच एमपीएससी विद्यार्थ्यांना आता न्यायालयातही लढा द्यावा लागणार आहे.
या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला नोटीस देण्यात आली आहे. पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनावरून राज्य सरकारसह, पोलीस आणि आयोजकांना नोटीस दिल्या आहेत. पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनांच्या विरोधात “पुणेकर” नागरिकांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आंदोलकांनी तात्काळ जागा सोडावी. आंदोलनकर्त्यांना निश्चित करून एक जागा द्यावी. तसेच आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
पुणे पोलीस आयुक्त, पोलीस उपआयुक्त यासह तिन्ही आंदोलनाच्या प्रमुख आयोजकांना नोटीस देण्यात आली आहे. राज्य सरकार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह तिन्ही आंदोलनाचे आयोजक प्रमोद पाटील, नितीन आंधळे, चेतन वाघज यांना नोटीस दिली आहे. उद्या सकाळी १०.३० वाजता मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
याआधी रोहित पवार म्हणाले होते की, महाराष्ट्राची जनता कुठे ना कुठे तरी उभी राहते आहे. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना सरकारनं मारू नये. राज्य सरकार गरीब विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना जाळत आहेत. इगो आणि मित्र देवेंद्र फडणवीसांकडे आहेत. गरीब विद्यार्थ्यांच्या मागे उभं राहणं म्हणजे राजकारण पाहायला मिळत आहे.