मुलासमोरच बापाचा रोमान्स… तब्बल 71 वर्षांपूर्वी आलेलं ऋषी कपूर यांचं पहिलं गाणं, आजही प्रचंड लोकप्रिय
ऋषी कपूर यांची अनेक गाणी प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांनी बालपणीच आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. तब्बल ७१ वर्षांपूर्वी आलेलं त्यांचं पहिलं गाणं, नेमकं कोणतं? जाणून घेऊयात...

बॉलिवूडमध्ये रोमँटिक गाण्यांना खूप महत्त्व आहे. रोमँटिक गाण्यांचा विषय निघाला की ऋषी कपूर यांचंही नाव आपोआप समोर येतं. त्यांच्या अनेक चित्रपटांमधील गाणी आजही बॉलिवूड संगीतप्रेमींच्या आवडीच्या गाण्यांच्या यादीत अग्रस्थानी आहेत. ऋषी कपूर यांच्या पहिल्या गाण्याचा किस्सा अनेकांना ठाऊक नसेल. विशेष म्हणजे, हे गाणं त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच चित्रित करण्यात आलं होतं.
आजही हिंदी सिनेसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय रोमँटिक गाण्यांपैकी हे एक आहे. या गाण्याला भारतरत्न लता मंगेशकर आणि मन्ना डे या दोन दिग्गज गायकांचा आवाज लाभला आहे. हे गाणं दुसरं-तिसरं कोणतं नसून, 1955 साली प्रदर्शित झालेल्या ‘श्री 420’ या चित्रपटातील ‘प्यार हुआ इकरार हुआ’ हे आहे. राज कपूर आणि नरगिस यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं होतं.
मात्र, या गाण्यात एक खास गोष्ट दडली होती. ती म्हणजे राज कपूर यांचा लहानगा मुलगा ऋषी कपूर. या गाण्यात ऋषी कपूरही झळकले होते. त्यावेळी त्यांचं वय फक्त 2-3 वर्षं होतं.
या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान एक मजेशीर किस्साही घडला होता, जो ऋषी कपूर यांनी स्वतः सांगितला होता. पावसात चित्रित होणाऱ्या या गाण्याच्या चित्रीकरणावेळी ऋषी कपूर व्यवस्थित अभिनय करत नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावर हवे तसे हावभाव उमटत नव्हते. अशा वेळी नरगिस यांनी त्यांना चॉकलेटचं आमिष दाखवलं. आपल्याला चॉकलेट मिळणार असल्याने ऋषी कपूर यांनी चित्रीकरणात पूर्णपणे सहकार्य केलं आणि गाण्याचं चित्रीकरण व्यवस्थितपणे पूर्ण झालं.
दरम्यान, या गाण्याबद्दल सांगायचं झालं तर, लता मंगेशकर आणि मन्ना डे यांनी या गाण्याला आवाज दिला होता. या गाण्याचे शब्द गीतकार शैलेंद्र यांनी लिहिले होते, तर शंकर-जयकिशन यांनी या सुपरहिट गाण्याला संगीत दिलं होतं.
राज कपूर आणि नरगिस यांच्यातील रोमँटिक केमिस्ट्री, पावसातील चित्रीकरण आणि या दोन दिग्गज गायकांचा आवाज यामुळे हे गाणं अजरामर झालं. आजही हे गाणं आवडीने ऐकलं जातं आणि जुन्या हिंदी सिनेमातील रोमँटिक काळाची आठवण करून देतं.
