50 फूट खोल दरीत पत्त्यासारखा फेकला, एक चमत्कार झाला अन्…, 2 तास बचाव; राजगडावर थरारक घटना
राजगडावर घडलेल्या थाररक घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. तब्बल 50 फूट खोल दरीत तरुण पत्त्यासारखे फेकला गेला... पण नशीब बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावला नाहीतर... नेमकं काय घडलं घ्या जाणून

तरुणांना वेगवेगळ्या फिरायला जायला प्रचंड आवडतं. अनेकांना तर गड किल्ल्यांवर फिरायला प्रचंड आवडतं. पण फिरताना स्वतःची काळजी घेणं आपली जबाबदारी असते. पण काही वेळा नकळत अशा काही घटना घडतात, ज्या प्रचंड धक्कादायक असतात. आता देखील असंच काही झालं. राजगडावर गेलेल्या तरुणासोबत असं काही घडलं ज्यामुळे त्याचे प्राणही गेले असते. पुण्यातील राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या एका युवकाचा चुकीच्या वाटेने गेल्यामुळे भीषण अपघात झाला. जळगाव येथे राहणारा अविनाश श्रावण बागुल हा तरुण आपल्या कुटुंबासोबत राजगड दर्शनासाठी आला होता.. बालेकिल्ल्याकडे जात असताना मुख्य रहदारीचा मार्ग सोडून तो चुकून दुसऱ्या पायवाटेने गेला. यावेळी त्याचा तोल जाऊन तो सुमारे 45 ते 50 फूट खोल दरीत घसरत गेला..
दरी घसरल्यामुळे त्याचा जीव देखील गेला असता. पण अविनाश याचं नशीब बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावला. सुदैवाने खाली असलेल्या एका मोठ्या झाडाला तो अडकल्याने त्याचा जीव वाचला. मात्र या अपघातात त्याच्या पाठीच्या मणक्याला फ्रॅक्चर झालं असून मान आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. युवक दरीत अडकल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. अत्यंत कठीण आणि धोकादायक परिस्थितीत तब्बल दोन तास चाललेल्या बचाव मोहिमेनंतर रेस्क्यू पथकाने युवकाला सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर त्याला पोलीस प्रशासन आणि नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं आणि पुढील उपचारासाठी त्याला रुग्णालयात रवाना करण्यात आलं.
या थरारक बचाव मोहिमेत तानाजी भोसले, गणेश सपकाळ, संजय चोरगे, योगेश गोपी, वैभव भोसले, दिलीप तळेकर, अनिल रेणुसे आणि विशाल पिलावरे यांनी मोलाची भूमिका बजावली. तसेच प्रतीक सावंत, रोहित खबाले या पर्यटकांनी आणि पोलीस पाटील सारिका दरडीघे यांनीही बचावकार्यात महत्त्वाची मदत केली.
राजगडावर दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. मात्र अधिकृत मार्ग सोडून धोकादायक पायवाटांचा वापर केल्यास अशा गंभीर दुर्घटना घडू शकतात. त्यामुळे प्रशासनाने पर्यटकांनी केवळ अधिकृत मार्गानेच प्रवास करावा आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असं आवाहन केलं आहे.