
पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण सध्या राज्यात चर्चेचा विषय बनले आहे. त्यातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अंजली दमानिया यांनी पोलिसांनी या प्रकरणाची हाताळणी ज्या पद्धतीने केली, त्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. तसेच हे सर्व राजकीय षडयंत्र आहे, असा संशय अंजली दमानिया यांनी व्यक्त केला आहे.
अंजली दमानिया यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी भाष्य केले. एकनाथ खडसे यांनी 2016 पासून मला प्रचंड त्रास दिला असला तरी, जे सत्य आहे ते मी बोलणारच. रेव्ह पार्टी म्हणजे जिथे शेकडो लोक एकत्र येतात, मोठ्या आवाजात संगीत आणि डान्स असतो आणि तिथे मोठ्या प्रमाणावर ड्रग्स आणि मद्यपान केले जाते.” असे अंजली दमानिया यांनी म्हटले.
पोलिसांनी सुरुवातीला हे रेव्ह पार्टीचे पिल्लू सोडून चुकीची माहिती दिली. या प्रकरणात सुरुवातीला केवळ काहीच नावे समोर आली. हे दुसरे पिल्लू सोडले गेले आणि बाकीच्यांची कुणाचीच नावं तोपर्यंत आली नव्हती, यावरून सगळे प्रश्नचिन्ह दिसत आहे. तसेच त्यावेळी पोलिसांची उपस्थिती आणि पोलीस आयुक्तांचे विधान धक्कादायक असल्याचे म्हटले. मला असं वाटतं आहे की हे सगळं राजकारणाचे षडयंत्र आहे, असं माझ्या बुद्धीला तरी दिसतंय,” असे अंजली दमानिया यांनी ठामपणे सांगितले.
“मला पोलिसांनी कायदेशीर कारवाई केलेली दिसत नाहीये. पोलिसांनी तीन दिवस पाळत ठेवून कारवाई केल्याचा दावा केला जातो. पहिल्या दिवशी तिथे ड्रग्स नव्हते म्हणून थांबलं गेलं, आता जे ड्रग्स आढळले ते कोणी ठेवले हे देखील माहिती नाही. त्यामुळे या सर्व प्रक्रियेत षडयंत्राचा वास येत आहे, असे अंजली दमानिया म्हणाल्या. अंजली दमानियांच्या या विधानांमुळे पुणे रेव्ह पार्टी प्रकरणी अनेक मोठमोठे खुलासे होणार असल्याचे बोललं जात आहे.
त्यासोबतच अंजली दमानिया यांनी वसई विरार पालिका आयुक्तांच्या ईडी चौकशीवरही भाष्य केले. जर हे आरोप खरे असले आणि दादा भुसे यांचे हे नातलग असले. त्याच्यात भ्रष्टाचार त्यांनी केला असेल तर याचे उत्तर प्रत्येकाने दिला पाहिजे. खरं तर या महत्त्वाच्या पोस्टपर्यंत ते पोहोचले कसे, खरच त्यांची तेवढी क्रेडिबिलिटी होती की नाही, परत आयुक्ता म्हणून इथे असताना 17 तारखेला ते रिटायर झाले होते. तरीपण 28 पर्यंत का थांबले आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर ED ची रेड झाली, त्यात इथून ते ठाण्याला जाणार होते हे देखील एक प्रश्नचिन्ह वाटतं, असे अनेक सवालही अंजली दमानियांनी उपस्थित केले.
ठाण्यात ते कार्यकारी अभियंता म्हणून जाणार होते. मला असं वाटतं की या ज्या पोस्ट त्यांना शिवसेनेच्या जवळच्या लोकांच्या मिळतात त्याच्यावर पण प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आताच्या घटकेला मला हे खूपच धक्कादायक वाटतंय की भ्रष्टाचार खरंच खूप जास्त वाढत चाललंय, असेही अंजली दमानिया म्हणाल्या.