
शनिवारी मध्यरात्री पोलिसांनी पुण्यात मोठी कारवाई केली, खराडी भागात एक रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती, पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला. धक्कादायक म्हणजे एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना या रेव्ह पार्टीमध्ये पोलिसांनी रंगेहाथ पकडलं. या प्रकरणानं राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
दुपारी देखील बोललो मला या संदर्भात कुठलेही राजकीय वक्तव्य करायचं नाही, पोर्शे प्रकरणात ज्या लोकांनी अहवालात गडबड केली त्यांना नोकरीतून काढून टाकलं आहे, त्यामुळे कोणीही गडबड केली तर त्यावर कारवाई होईल आणि तेव्हापासून जे काही अहवाल आहेत, ते वेळेत आणि योग्य आले पाहिजे अशा प्रकारचा हा विभागाचा प्रयत्न आहे. एखादा अहवाल आधी आला, एखादा उशिरा आला यातून त्याचं मूल्यमापन करणे योग्य नाही, मी याला राजकीय रंग देऊ इच्छित नाही आणि त्यांनीही याला विनाकारण राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये, त्यातून कुठेतरी त्यांच्याकरता योग्य होणार नाही असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान दुसरीकडे आज एकनाथ खडसे यांनी वकील असीम सरोदे यांची भेट घेतली. एनडीपीएस कायदा आणि प्रांजल खेवलकर यांच्या प्रकरणाबाबत एकनाथ खडसे यांनी असीम सरोदे यांच्याशी चर्चा केली आहे.
पोलिसांनी या प्रकरणात चौकशीदरम्यान अनेक कायदेशीर चुका केल्या असल्याचं यावेळी असीम सरोदे यांनी म्हटलं आहे. काही लोकांना आरोपी म्हणून बदनाम करण्यासाठी त्यांच्या घरात घुसून व्हिडिओ शूटिंग करणे, व तो व्हिडिओ व्हायरल करणे पोलिसांना भोवणार आहे, इतरांच्या खासगी आयुष्याचा अपमान करणारे हे कोणते पोलिसिंग आहे? राजकीय हेतुप्रेरित पोलिसिंग बंद करण्यासाठी पावले उचलणार आहे, असा इशाराही यावेळी असीम सरोदे यांनी दिला आहे.
दरम्यान पुणे रेव्ह पार्टीसंदर्भात एकनाथ खडसे यांना कायदेशीर सल्ला दिलेला आहे, एकनाथ खडसे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत त्यांनी या प्रकरणामागे गिरीश महाजन असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात पोलिसांची कारवाई संशयास्पद आहे, कोणाच्या खासगी आयुष्यात डोकावण्याचा पोलिसांना कोणताही अधिकार नाही. या प्रकरणात गरज लागली तर मी कायदेशीर बाजू मांडणार आहे, असंही यावेळी सरोदे यांनी म्हटलं आहे.