AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीसांच्या मंचाखाली आढळला विषारी साप, कार्यक्रमात मोठा गोंधळ, Video समोर

देवेंद्र फडणवीसांच्या मंचाखाली आढळला विषारी साप, कार्यक्रमात मोठा गोंधळ, Video समोर

| Updated on: Oct 16, 2025 | 12:09 PM
Share

पुण्यातील सिम्बॉयसिस महाविद्यालयात पदवी प्रदान सोहळ्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार होते. मात्र, त्यांच्या आगमनापूर्वी मंचासमोर साप आढळल्याने सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली.

पिंपरी चिंचवडजवळील किवळे येथील सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये आज सहावा दीक्षांत समारंभ पार पडणार आहे. त्यासोबतच स्कूल ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजीचा उद्घाटन सोहळाही आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. मात्र या महत्त्वपूर्ण सोहळ्यापूर्वी मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमातील मंचाखाली एक विषारी साप आढळल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यावरुन सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, राजनाथ सिंग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्या मुख्य मंचावर उपस्थित राहणार होते, त्याच मंचाखाली एक साप आढळून आला. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती (VVIP) मंचावर येण्यापूर्वी सापाचा शिरकाव झाल्याने सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ उडाली. सध्या या सापाला शोधण्याचे मोठे आव्हान यंत्रणांसमोर होते. ज्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तातडीने कार्यवाही करत यंत्रणांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणली.

या कार्यक्रमासाठी राज्यमंत्री माधुरी मिसाळ सिम्बॉयसिस विद्यापीठात दाखल झाल्यानंतर प्रोटोकॉलवरून मोठा वाद निर्माण झाला. विद्यापीठ प्रशासनाकडून मिसाळ यांना गेटवर स्वागत करण्यासाठी कोणीही आले नाही. यामुळे राज्यमंत्री माधुरी मिसाळ चांगल्याच संतापल्या. राज्यमंत्रीपदाच्या प्रोटोकॉलचा सिम्बॉयसिस प्रशासनाने अवमान केल्याचा आरोप करत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. ज्यामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण स्थिती होती.

तर दुसरीकडे दीक्षांत समारंभासाठी आलेल्या पालकांनी ऑडिटोरियमच्या बाहेर मोठा गोंधळ घातला. मंत्री राजनाथ सिंग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असलेल्या या सोहळ्यात पालकांना सभागृहात प्रवेश नाकारण्यात आला. युनिव्हर्सिटी प्रशासनाकडून पालकांना कार्यक्रमाबाबत योग्य त्या सूचना वेळेत मिळाल्या नाहीत. यामुळे संतप्त झालेल्या पालक वर्गाने नाराजी व्यक्त करत गोंधळ घातला.

देवेंद्र फडणवीसांचा विद्यार्थ्यांना सल्ला

या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीक्षांत समारंभात उपस्थितांना संबोधित केले. सिम्बॉयसिसने स्किल डेव्हलपमेंटमध्ये अग्रसर पाऊल टाकले आहे, पण इथं एक स्किल मिसिंग आहे आनंदी राहण्याचं आणि आनंदी जगण्याचं. याची पहिली स्टेप टाळ्या वाजवण्याची आहे. माझ्यासाठी किंवा इतरांसाठी नव्हे, तर स्वतःसाठी टाळ्या वाजवाव्यात. राजनाथ सिंग एक असे नेते आहेत, ज्यांचा पक्षात असो की विरोधी पक्षात, मान-सन्मान राखला जातो आणि तो आजही कायम आहे. भारताला महाशक्ती बनवायचं असेल तर कौशल्य विकासावर भर देणं हिचं काळाची गरज आहे. तुमचं भविष्य उज्वल आहे, तुम्ही मोठे व्हा, प्रगती करा. फक्त पुढं जाताना मागे वळून पहा, आपण समाजाचं देणं लागतो. त्यासाठी ही योगदान द्या, असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

Published on: Oct 16, 2025 11:30 AM