
Ajit Pawar Political Journey: महाराष्ट्राच्या राजकारणात आजची सकाळ सर्वात वाईट बातमी घेऊन आली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. अजितदादांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राने एक उमदं नेतृत्व गमावलं. राजकारणातील दादा म्हणून त्यांचा सर्वांनाच आदरयुक्त धाक होता. दादा हे राजकारणातील धडाडीचं व्यक्तिमत्व होतं. काका शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी राजकीय धडे गिरवले. त्यांनी स्वतःची एक वेगळी आणि खास ओळख निर्माण केली. गेल्या काही वर्षात तर त्यांनी वेगळी वाट चोखंदळत त्यांचं राजकीय अस्तित्वही दाखवून दिले. तर या महानगरपालिका निवडणुकीपासून दोन्ही राष्ट्रवादींची एकजूट आणि एकमोट बांधण्याचा त्यांचा प्रयत्नही दिसून येत होता. रोखठोक आणि वक्तशीर लोकनेत्याची अशी होती राजकीय कारकीर्द…
काकांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय धडे
अजितदादांचा जन्म हा अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यामधील देवळाली येथे २२ जुलै १९५९ रोजी झाला. १९८२ मध्ये त्यांनी स्थानिक राजकारणात प्रवेश केला. त्यांनी काका शरद पवार यांच्या नेतृत्वात राजकीय धडे गिरवायला सुरुवात केली. शरद पवार यांच्या अनेक निर्णयाचे ते साक्षीदार होते. शरद पवार यांच्यासोबत त्यांनी अनेक पदांवर काम केले. १९९३ साली शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तेव्हा अजितदादांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. त्यांनी वित्त, नियोजन, ऊर्जा, जलसंपदा, ग्रामीण विकास यासह अनेक खाती त्यांनी सांभाळली. त्याचवेळी शेती, सहकार आणि ग्रामीण भागाशी त्यांची मजबूत नाळ जोडल्या गेली. बारामतीच्या स्थानिक राजकारणासह राज्यातील अनेक जिल्ह्यांशी त्यांच्या थेट संबंध आला. काकांसारखेच ते कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या कायम गरड्यात राहिले. भल्या पहाटे पासून काम करण्याची त्यांची सवय अनेकांना आश्चर्यचकीत करणारी होती. राजकारणात या पद्धतीने काम करणारे नेते फारच विरळ आहेत. दादांचा कामाचा झपाटा, उरक अनेकांना प्रेरणादायी होता. ते नेहमी भल्यामोठ्या फरकाने विजयी झाले आहेत.
काकांसाठी अजितदादांचा खासदारकीचा राजीनामा
१९९१ साली अजितदादांना काँग्रेसने खासदारकीचं तिकीट दिलं. सर्व उमेदवारांची अगोदर घोषणा झाली. ऐन शेवटच्या टप्प्यात अजितदादांना खासदारकीची तिकीट देण्यात आलं. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण आणि अजितदादा पवार हे निवडून आले. पुढे हे दोघे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकत्रित होते. पण राजीव गांधी यांच्या हत्येनंतर पी.व्ही. नरसिंह राव यांच्याकडे देशाचे नेतृत्व आले. त्यांनी तातडीने शरद पवार यांना संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी दिली. संसद सदस्यत्वासाठी मग बारामती मतदार संघ सुरक्षित होता. काकांसाठी दोन-तीन महिन्यांपूर्वी निवडून आलेले अजितदादा यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर लागलीच त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. त्यानंतर त्यांचा राज्यातील राजकीय झंझावात कमी झाला नाही. पुढे ३५ वर्षांहून अधिक काळ ते महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय होते. या काळात त्यांनी बारामती मतदारसंघाचं तीन दशकांहून अधिक काळ प्रतिनिधीत्व केलं.
उपमुख्यमंत्री पदाचा रेकॉर्ड
१९९५, १९९९, २००४, २००९ , २०१४, २०१९ आणि २०२४ असे सलग त्यांनी बारामती मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. त्यांनी मंत्रिमंडळात कृषी आणि ऊर्जा राज्यमंत्री म्हणून काम केले. पाणी पुरवठा, नियोजन राज्यमंत्री, पाटबंधारे, फलोत्पादन, ग्रामीण विकास, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, पाटबंधारे मंत्री, तर राज्याचे अर्थमंत्री त्यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिली आहे. अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाचा रेकॉर्ड केला. ते सातवेळा उपमुख्यमंत्री झाल्याचा दावा करण्यात येतो. ते स्वतः आपण उपमुख्यमंत्री पदाचा रेकॉर्ड केल्याचे मिश्किल पणे म्हणायचे. त्यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं.