पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणात अजित पवार अडचणीत, अंजली दमानिया यांनी केली थेट राजीनाम्याची मागणी आणि…
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदासह पालकमंत्रिपदाचा राजीनामा मागितला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याच्यावर गंभीर आरोप करण्यात आलीत. पुण्यातील खराडी भागात असलेल्या जमीन घोटाळ्यात पार्थ पवाराचे नाव आले. यानंतर थेट विरोधकांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पार्थ पवार याची कंपनी अमेडियाने हा जमीन व्यवहार केला होता. अजित पवारांनी स्पष्ट म्हटले की, या जमीन व्यवहाराबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. मी पार्थला हा जमीन व्यवहार रद्द करण्यास सांगितले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या प्रकरणात गंभीर आरोप करताना दिसत आहेत. अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत काही महत्वाचे खुलासे केले. अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांनंतर अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
अंजली दमानिया यांनी म्हटले की, या जमीन व्यवहार प्रकरणात एक समिती स्थापन करण्यात आली. मात्र, सहापैकी पाच सदस्य हे पुण्यातील आहेत. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असताना ही कमिटी चाैकशी करू शकेल का? निपक्ष चाैकशी ही समिती करू शकेल का? यामुळेच माझी पहिली मागणी आहे की, अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदापासून ते पालकमंत्रिपदापर्यंत ताबडतोब राजीनामा द्यावा.
गायकवाड कुटुंबियांच्या नावाने ही जमीन नाही, मग ते व्यवहार कसा करू शकतात. शीतल तेजवानी नावाच्या व्यक्तीने जिल्हाधिकाऱ्यांना या जमिनीबद्दल पत्र दिले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर काहीच कारवाई केली नाही. यामुळे सर्वात अगोदर या जिल्हाधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन केले पाहिजे. आम्ही तो व्यवहार रद्द करतो, म्हणजे आम्ही चोरीचा माल परत करतो, असे म्हटल्यासारखे आहे.
पार्थ पवार यांच्यावरही ताबडतोब FIR दाखल करा, असे अंजली दमानिया यांनी म्हटले. अजित पवारांनी सांगितले त्याप्रमाणेच झाल्याचाही दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणात अंजली दमानिया यांनी थेट अजित पवारांचाच राजीनामा मागितला आहे. अमेडिया कंपनीबद्दल आपण अजून काही मोठे खुलासे करणार असल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे. पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणात अजित पवारांच्या अडचणी वाढताना आता स्पष्ट दिसत आहे.
