
पुण्यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी जुन्या वादातून आयुष कोमकर या तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. आयुष हा गेल्या वर्षीच्या वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आहे. वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने आयुषची हत्या केल्याचा आरोप आहे. या हत्येप्रकरणी 1 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता पोलिसांनी आंदेकर टोळीवर सर्वात मोठी कारवाई केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आयुष कोमकर हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी बंडू आंदेकरसह 8 आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. त्यामुळे आंदेकर टोळीचा पाय आणखी खोलात गेला आहे. पोलिसांनी आयुष कोमकरची हत्या करणाऱ्या आंदेकर टोळीवर मकोका कारवाईसाठी प्रस्ताव सादर केला होता. आता पोलिस आयुक्तांनी हा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची चिंता आणखी वाढली आहे.
मंगळवारी पुणे सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळी बंडू आंदेकरने सांगितले की, ‘आम्हाला या प्रकरणात गोवलं जात आहे, हत्येच्या वेळी आम्ही केरळमध्ये होतो. मी माझ्या नातवाचा खून का करू? तो माझा वैरी नाही. वनराज अंदेकर नगरसेवक होता. तो युथ आईकोन होता. त्यामुळे त्याचा खून केला असावा.’ आता आरोपींना 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गेनाइज्ड क्राइम अॅक्ट म्हणजेच मकोका कायदा संघटीत गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी 1999 मध्ये आणला. हप्ता वसुली, खंडणी वसुली, अपहरण, हत्या, सामुहिक गुन्हेगारी या विरोधात मकोका लावला जातो. संघटीत गुन्हेगारी आणि अंडरवर्ल्ड संपवण्यासाठी हा कायदा करण्यात आला. हा कायदा लावल्यानंतर आरोपींना सहजासहजी जामीन मिळत नाही.
या कायद्यातंर्गत आरोपींचा कबुलीजबाब नोंदवता येतो. त्या कबुलीजबाबाचा वापर इतर सहआरोपींसाठी करता येतो. मकोको कायदा फरार आरोपीवरही लावता येते. तसेच या कायद्याअंतर्गत आरोपींची संपत्ती जप्त करता येते, तसेच बँक खातीही गोठवता येतात. मकोका हा कायदा कठोर आहे. हा कायदा लावल्यानंतर आरोपींची सहजासहजी सुटका होत नाही. यामध्ये किमान शिक्षा पाच वर्षांची व कमाल जन्मठेपेची शिक्षा आहे. तसेच या प्रकरणात आरोपींना मदत करणाऱ्यांवर देखील कारवाई केली जाते.