बालगंधर्व नाट्यगृहाचा पुनर्विकास गरजेचा पण…; प्रशासनाने खासगी नाट्यगृह चालकांशी चर्चा करून तोडगा काढावा

बालगंधर्व नाट्यगृहाचा पुनर्विकास गरजेचा पण...; प्रशासनाने खासगी नाट्यगृह चालकांशी चर्चा करून तोडगा काढावा

सध्या पुनर्विकासासाठी जो विरोध होत आहे, त्यामध्ये प्रामुख्याने पुनर्विकासाच्या दोन वर्षांच्या कालावधीत नाट्यरसिकांना आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कलाकारांना, नाट्यगृहापासून वंचित रहावे लागणार असल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

महादेव कांबळे

|

May 19, 2022 | 8:56 PM

पुणेः पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येमुळे शहराचा विकास अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करणे आवश्यक आहे. त्यामध्येच बालगंधर्व (Balgandharva) नाट्यगृहाचा पुनर्विकास (Redevelopment theater) ही गरजेचाच आहे. ‌पण महापालिका (Pune Municipal Corporation) प्रशासनाने यासंदर्भातील विरोधाचे कारण लक्षात घेऊन खासगी नाट्यगृह चालकांशी चर्चा करून तोडगा काढावा, अशी सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज केली. आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकास प्रकल्पाचा आढावा घेतला.

यावेळी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, आशुतोष वैशंपायन यांच्यासह चित्रपट आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

विकासात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

बालगंधर्व नाट्यगृहाच्या पुनर्विकासाच्या सादरीकरणानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येमुळे शहराचा विकासदेखील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सर्वांना उत्तम सुविधा पुरविणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे.‌ त्यासाठी नदीसुधार प्रकल्प असो किंवा बालगंधर्व नाट्यगृहाचा पुनर्विकास! वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने हे दोन्ही प्रकल्प साकारणे आवश्यक आहेत.

नियोजनबद्ध पद्धतीने बालगंधर्व नाट्यगृहाचा पुनर्विकास

ते पुढे म्हणाले की, बालगंधर्व नाट्यगृहाचा पुनर्विकास अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येणार असल्यामुळे, पुणे शहराच्या सौंदर्यात भरच पडणार आहे. कारण पुनर्विकासात नाट्य संस्कृतीच्या जोपासनेसह, नव्या पीढीमध्ये मराठी नाट्य क्षेत्राबद्दल ओढ निर्माण व्हावी, यासाठीचे सर्वप्रकारचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच याचा पुनर्विकास होताना जागेचा व्यवसायिक कारणांसाठी वापर होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.

वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी नाट्यगृह

आमदार पाटील म्हणाले की, नव्या नाट्यगृहाच्या पुनर्विकासात एक हजार, पाचशे आणि तीनशे आसन क्षमतेचे रंगमंच उभारण्यात येणार असल्यामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी नाट्यगृह उपलब्ध होणार आहे. त्यासोबतच नाट्यप्रेमींनाही नवनवीन नाटकांचा आस्वाद घेता येईल. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचे सादरीकरण पाहिल्यानंतर हे रंगमंदिर भविष्यात जागतिक दर्जाचे होणार असा त्यांनी विश्वासही व्यक्त केला.

खासगी नाट्यगृह चालकांशी चर्चा

सध्या पुनर्विकासासाठी जो विरोध होत आहे, त्यामध्ये प्रामुख्याने पुनर्विकासाच्या दोन वर्षांच्या कालावधीत नाट्यरसिकांना आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कलाकारांना, नाट्यगृहापासून वंचित रहावे लागणार असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरातील इतर खासगी नाट्यगृह चालकांशी चर्चा करून, यावर तोडगा काढावा, आणि किमान पुनर्विकासाचे काम पूर्ण होईपर्यंत अत्यल्प दरात महापालिकेसह खासगी नाट्यगृहे नाट्यरसिकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें