इकडे गोकुळचं मतदान, तिकडे चंद्रकांत पाटलांनी टाकला मोठा डाव, बंटी पाटलांवर सनसनाटी आरोप, थेटच…
गेल्या 15 दिवसापासून शिव्याशाप दिले. ते या एका विजयाने संपणार आहे. गेले 15 दिवस सोशल मीडियातून महायुतीला बदनाम करण्याचा, महायुतीच्या नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. निदान महायुती म्हणून सर्व पक्ष एकत्र तरी आहेत. महाविकास आघाडी म्हणजे फक्त बंटी पाटील दिसत आहे. त्यांच्यासोबत ना ठाकरेंचा पक्ष दिसला, शरद पवारांचा, असा जोरदार हल्ला चंद्रकांत पाटील यांनी चढवला.

कोल्हापुरात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी मतदान सुरू आहे. इकडे मतदान सुरू असतानाच दुसरीकडे महायुतीने कोल्हापुरात विराट मोर्चा काढला आहे. या मोर्चाचं सभेत रुपांतर झालं असून या मोर्चाला संबोधित करताना भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी मोठा डाव टाकला आहे. चंद्रकांत पाटील यांनी बंटी ऊर्फ सतेज पाटील यांच्यावर थेट आणि गंभीर आरोप केला आहे. बंटी पाटील हे सोनिया गांधी यांना ब्लॅकमेल करत होते, असा सनसनाटी आरोपच चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
महायुतीचे 166 सदस्य निवडून आले होते. 144 ला विधानसभेत बहुमत होतं. तेव्हा बंटी पाटील हे काँग्रेसच्या एका गटाचं नेतृत्त्व करत होते. बंटी पाटील हे शरद पवारांच्या मदतीने जयपूरला जाऊन लपले होते. त्यांनी सोनिया गांधींना दम दिला होता. जर तुम्ही शिवसेनेबरोबर आणि शरद पवारांसोबत सरकार बनवलं नाही तर आम्ही 40 जणांचा गट फोडू आणि सरकारमध्ये सहभागी होऊ, असा दम बंटी पाटील यांनी सोनिया गांधींना दिला होता, असा सनसनाटी गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
सोनिया गांधींना दम
ज्या शिवसेनेला आणि भाजपला मोदींचा फोटो घेऊन मते मागावी लागली, ती अख्खी शिवसेना तुम्ही चोरली आहे. तेव्हा जनादेश पायदळी तुडवून तुम्ही उद्धव ठाकरेंचं सरकार केलं. मला सर्व माहीत आहे. वेळ पडली तर मी कॉल रेकॉर्ड द्यायला तयार आहे. सोनिया गांधींबरोबर तुमचा व्हिडीओ कॉल झाला होता. तेव्हा तुम्ही त्यांना दम देत होता. कोल्हापूरचा एक माणूस आहे, देशात तोच एकमेव माणूस आहे, जो सोनिया गांधींना सोनिया म्हणतो. त्यानेच मला हे सांगितलं. त्या व्यक्तीने माझ्या समोर सोनिया गांधीला फोन लावला. फोन स्पीकरवर ठेवला. म्हणाले, सोनिया हे बरोबर चाललं नाही. तेव्हा सोनिया गांधी म्हणाल्या, तो कोल्हापूरचा बंटी धमकावत आहे. तो गट निर्माण करतो म्हणतोय, असा खळबळजनक दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.
ही दादागिरी चालणार नाही
तुम्ही सोनिया गांधींना धमकावत होता, याला वोट चोरी म्हणतात. तो जनादेश चोरी चालतो आणि एकनाथ शिंदे बाहेर पडलेले चालत नाही? तुम्ही कराल ते योग्य, मुश्रीफ करणार ते अयोग्य? हे आता चालणार नाही. ही दादागिरी चालणारी नाही, असा इशाराच त्यांनी दिला.
म्हणून तुम्ही बंटी राहिला
बंटी पाटील यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. पण त्यासाठी त्या प्रकारची समजदारीही लागते. मी अलिकडच्या काळात महाडिकांना मुन्नासाहेब तरी म्हणा, किंवा धनंजय महाडिक म्हणा, असं सांगत होतो. बंटी पाटील विरोधक असले तरी बंटी का म्हणता? असं मला वाटायचं. पण 15 दिवसात कळलं ते बंटी आहेत. बंटी साहेब झालेच नाही. एखादं मुलगं खेळणं मिळालं नाही तर त्रागा करतं. 15 दिवस हेच चाललंय आहे. गोकुळचं अध्यक्षपद मिळालं नाही म्हणून मुश्रीफांना बोचकार… अध्यक्षपद मिळालं नाही, तर चंद्रकांत पाटलांना बोचकार… तुम्ही असं वागत असल्याने तुम्ही बंटी राहिलात, असा चिमटा त्यांनी काढला.
