अनिश्चित काळासाठी समाज बंद करुन ठेवणार का? चंद्रकांत पाटील यांचा राज्य सरकारला सवाल

| Updated on: Jul 22, 2021 | 5:16 PM

कोरोनाच्या भीतीमुळे अनिश्चित काळासाठी समाज बंद करून ठेवणार का? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (22 जुलै) महाविकास आघाडी सरकारला केला.

अनिश्चित काळासाठी समाज बंद करुन ठेवणार का? चंद्रकांत पाटील यांचा राज्य सरकारला सवाल
Follow us on

पुणे : कोरोनाच्या भीतीमुळे अनिश्चित काळासाठी समाज बंद करून ठेवणार का? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (22 जुलै) महाविकास आघाडी सरकारला केला. लसीचे 2 डोस घेतलेल्यांना योग्य काळजी घेऊन व्यवहार करण्याची परवानगी सरकारने दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, अजित पवार आणि राजेश टोपे यांच्याप्रमाणेच आपलेही तेच मत आहे. आपण ते आधीपासूनच व्यक्त केले आहे. लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, फिजिकल डिस्टन्सिंग, गर्दी टाळणे असे नियम पाळून काम सुरू केले पाहिजे. ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले त्यांच्यासाठी व्यवहार खुले करावेत. जनजीवन बंद ठेऊन चालणार नाही, परिस्थितीला सामोरे जावे लागेलच. अनिश्चित काळासाठी समाज बंद करून ठेवणार का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीचे दोन डोस घेतलेल्यांना निर्बंधांतून सवलत द्यावी, असं मत व्यक्त केलंय. त्यावर पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली.

“आगामी काळातही फडणवीसांना महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी”

चंद्रकांत पाटील म्हणाले, “विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. देवेंद्र फडणवीस यांनी 5 वर्षांत मुख्यमंत्री म्हणून काम करताना सामान्य माणसाला सूख देण्यासाठी व त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना आगामी काळातही महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी.”

“राजकारणातील परखड माणूस”

राजकारणातील परखड माणूस अशा शब्दात गौरव करून चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नेत्यांच्या वाढदिवसाला बेकायदा होर्डिंग्ज लाऊन नेत्यांना अडचणीत आणू नका आणि आचारसंहिता पाळा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. बेकायदेशीर होर्डिंग्ज लावणाऱ्या कार्यकर्त्यांवरील कारवाईचे त्यांनी समर्थन केले.

“चिपळूण येथे ढगफुटी होऊन गंभीर पूरस्थिती”

रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण येथे ढगफुटी होऊन गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. तेथे तातडीने मदत पाठवून जीवितहानी होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. राज्याच्या अन्य काही भागातील पूरस्थितीबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली.

“नव्या सहकार मंत्रालयाचा आणि या घटनादुरुस्तीचा काही संबंध नाही”

सर्वोच्च न्यायालयाने सहकाराविषयी जो निकाल दिला आहे तो तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग आणि कृषीमंत्री शरद पवार यांच्या केंद्र सरकारने केलेल्या घटनादुरुस्तीबाबत आहे. या निकालामुळे मोदी सरकारला धक्का बसला असे म्हणणे चुकीचे आहे. मोदी सरकारने निर्माण केलेल्या नव्या सहकार मंत्रालयाचा आणि या घटनादुरुस्तीचा काही संबंध नाही, असे त्यांनी सांगितले.

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्याशी आपली ओबीसींना राजकीय आरक्षण कसे मिळेल याविषयी चर्चा झाली. तसेच पक्षाच्या बूथ रचना अभियानाविषयी विचारविनिमय झाला, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

हेही वाचा :

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पंकजा मुंडेंच्या भेटीला, मुंडेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न?

ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा डाव भाजप यशस्वी होऊ देणार नाही- चंद्रकांत पाटील

पृथ्वीबाबांनी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली की हेटाळणी?; चंद्रकांत पाटलांचा खोचक सवाल

व्हिडीओ पाहा :

Chandrakant Patil question MVA government over restriction amid Corona