‘…तोपर्यंत मी आरोपी नाही’; वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर पहिल्यांदाच थेट बोलल्या

वादग्रस्त IAS पूजा खेडकर यांच्या अडचणीमध्ये वाढ होत असल्याचं दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून माध्यमांशी काहीही न बोलणााऱ्या खेडकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर पूजा खेडकर काय म्हणाल्या जाणून घ्या.

...तोपर्यंत मी आरोपी नाही; वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर पहिल्यांदाच थेट बोलल्या
| Updated on: Jul 15, 2024 | 6:24 PM

राज्यभरातच नाहीतर देशात पूजा खेडकर नावाची जोरदार चर्चा होत असलेली पाहायला मिळत आहे. वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. पूजा खेडकर प्रशिक्षणार्थी असताना स्वत:साठी कॅबिन आणि गाडीवर सरकारी दिव्याची मागणी, दिव्यांग प्रमाणपत्र, उत्पन्न जास्त असतानाही क्रिमिलेअर प्रमाणपत्रामुळे त्यांच्या चौकशीसाठी कमिटी नेमली आहे. हे प्रकरण चर्चेत आल्यावर माध्यमांशी बोलताना मी तुमच्यासमोर काही बोलू शकत नाही, असं पूजा खेडकर म्हणाल्या होत्या. अशातच त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

माझ्यावर अने्क आरोप करण्यात आलेत. मात्र भारताच्या संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिला आहे की, जोपर्यंत एखाद्यावरील आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत ती व्यक्ती आरोपी होत नाही, असं पूजा खेडकर म्हणाल्या. मीडियामध्ये जे काही आरोप करण्यात येत आहेत त्यावरही माझं म्हणणं कमिटीसमोरच मांडणार असल्याचं खेडकर यांनी सांगितलं.

कोणी काही जरी आरोप केले तरी मात्र त्याचं उत्तर मी नेमलेल्या कमिटी समोर मी सादर करणार आहे. ते दाखल करण्यात आलेले दस्तावेज असतील किंवा सर्टिफिकेट असतील मी ते कमिटी समोर मांडणार आहे. प्रशासन कसं चालतं आणि सगळी कामे कशी होतात हे सर्वसामान्य जनतेला माहीत आहेत. म्हणून मी माझं म्हणणं कमिटीसमोर मांडणार आहे. मीडिया माझ्यावरील आरोप जनतेसमोर मांडत आहे. पण मी माझं म्हणणं कमिटीसमोरच मांडणार आहे, असंही पूजा खेडकर यांनी स्पष्ट केलं.

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर हिचा दिव्यांग प्रमाणपत्रसाठी करण्यात आलेला अर्ज औंध जिल्हा रुग्णालयाकडून फेटाळण्यात आला होता. पूजा खेडकर हिने औंध जिल्हा रुग्णालयाला अर्ज दाखल करण्यापूर्वी आणखीही दुसऱ्या ठिकाणी अर्ज दाखल केला असल्यामुळे संगणक प्रणालीत तो आपोआप फेटाळण्यात आल्याचं अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीनिवास यांनी स्पष्ट केलं.

पूजा खेडकर यांना कोणत्या आधारे दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आले, याबाबतची कागदपत्रे घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हाधिकारी यांच्यात बैठक सुरू आहे. खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रा संदर्भातील कागदपत्रे घेऊन डॉ. घोगरे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या भेटीला आलेत.

पूजा खेडकर यांच्या आईचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

पूजा खेडकर यांच्या आईचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. त्यामध्ये एका शेतकऱ्याला बंदुक दाखवत असल्याचं दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओनंतर मनोरम खेडकर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून त्या फरार असल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे.