शपथविधीच्या पंधरा दिवस आधीच शरद पवार यांच्याशी झाली चर्चा, अजित पवार यांच्या मंत्र्याच्या गौप्यस्फोट

Ajit Pawar : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड पुकारत आपला वेगळा गट तयार केला. हा गटच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा करत शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये सहभाग घेतला. यासंदर्भात पडद्यामागे काय घडले होते...

शपथविधीच्या पंधरा दिवस आधीच शरद पवार यांच्याशी झाली चर्चा, अजित पवार यांच्या मंत्र्याच्या गौप्यस्फोट
sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 09, 2023 | 3:33 PM

सुनिल थिगळे, मंचर, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड पुकारुन राज्यातील शिवसेना-भाजप युतीबरोबर जाण्याचा निर्णय अजित पवार यांनी मागील रविवारी घेतला. हा निर्णय घेण्यापूर्वी शरद पवार यांनाही सांगण्यात आले होते. पंधरा दिवसांपूर्वी यासंदर्भात शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठ्या नेत्याने केला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाच्या या निर्णयाची कल्पना शरद पवार यांना पंधरा दिवसांपूर्वीच होती. त्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसमधील हे बंड ते रोखू शकले नाही.

कोणी केला दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अन् नवनिर्विचित कॅबिनेट मंत्री दिलीप वळेस पाटील यांनी मंचरमध्ये बोलताना अनेक दावे केले. भाजपसोबत जाण्याचा निर्णय का घेतला, शरद पवार यांची साथ का सोडली? याची स्पष्टीकरण त्यांनी दिले. डिंभे धरणाच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सामुदायिक होता, असा दावा दिलीप वळसे यांनी केला आहे. शपथविधी होण्याअगोदर साधारण पंधरा दिवसांपूर्वी शरद पवार यांच्याशी बोलणं झालं होतं, परंतु त्यांनी भाजप सोबत जाऊ नये, असे सांगितले होते, असे दिलीप वळसे यांनी सांगितले.

पवार यांना सोडल्याचे दु:ख पण…

भाजप सोबत जाण्यासंदर्भात पक्षाच्या बैठका होत होत्या. त्यातील चर्चा आम्ही सुप्रिया सुळे यांच्या कानावर टाकली. त्यांना, तुम्ही साहेबांना सांगा, असे म्हटले. दोन-तीन दिवसांत साहेब उत्तर येणार होते, मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी आम्हीच साहेबांकडे गेलो आणि त्यांना भूमिका सांगितली. त्यानंतर आता जवळपास ४० आमदारांनी अजित पवार यांची साथ दिली. शरद पवार यांना सोडल्याच्या निर्णयाचं आपणास दुःख असल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. लवकरच आपण शरद पवार साहेबांची वेळ घेऊन त्यांना भेटणार आहे. आपण आजपर्यंत कधी पक्षाची शिस्त कधी मोडली नाही, असे दिलीप वळसे यांनी सांगितले.

पक्ष बदलला नाहीच

शरद पवार यांच्यासोबत परत जाणार का? या प्रश्नावर बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, या प्रश्नाचे उत्तर आज देता येणार नाही, शरद पवार यांची साथ सोडण्याचा निर्णय माझा एकट्याला नव्हता, सगळ्यांनी मिळून सामुदायिक तो निर्णय घेतला होता. त्यामुळे या पुढे जे काही निर्णय होतील, ते ही  सामुदायिक असतील. आम्ही पक्ष बदलेला नाही, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहोत, फक्त जनतेच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे, असे दिलीप वळेस यांनी सांगितले.