
पुणे हिट अँड रन प्रकरणात कोर्टाने अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना ३१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडी मिळाल्यानंतर सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांना पोलीस आयुक्तालयात आणण्यात आले आहे. गुन्हे शाखेकडून आता दोघांची समोरासमोर चौकशी केली जात आहे. हिट अँड रन प्रकरणात चालकाला डांबून ठेवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल आहेत.
दुसरीकडे ससून हॉस्पिटलमधील शिपाई अतुल घटकांबळे याला पोलीस आयुक्तालयात आणले आहे. घटकांबळेने डॉक्टर अजय तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्यातील संवादाचे काम केले होते. अल्पवयीन मुलाचे ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी लागणारा मोबदला किती आणि तो कसा द्यायचा, हे घटकांबळे याने या दोघांशी बोलवून ठरवले होते. याच प्रकरणात घटकांबळेची आज चौकशी केली जाते आहे. या चौकशीत आणखी कोणी घटकांबळेशी संवाद साधला का? त्यासोबतचं डॉक्टर तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्या वेतिरिक्त आणखी तिसऱ्या व्यक्तीचा या प्रकरणात संबंध आहे का? हे तपासण्यासाठी पुणे गुन्हे शाखेकडून आज घटकांबळेची कसून चौकशी केली जाते आहे.
पुण्यातील विशाल अग्रवाल या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने भरधाव पोर्शे कारने एका दुचाकीला उडवले होते. ज्यामध्ये दोन इंजिनियर्सला मृत्यू झाला होता. या प्रकरणात मुलगा अल्पवयीन असल्याने सुरुवतीला त्याला फक्त ३०० शब्दात निबंध लिहून देण्याच्या अटीवर सोडण्यात आले होते. पण जेव्हा यावर लोकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली तेव्हा या प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले. यानंतर पोलिसांनी कारवाईच्या सूचना देण्यात आल्या.
वरच्या कोर्टाने या अल्पवयीन मुलाला नंतर बाल सुधार गृहात पाठवले आहे. वडील आणि आजोबा यांनी त्यांच्या ड्राईव्हरला या प्रकरणातील गुन्हा आपल्यावर घेण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप आहे. ड्राईव्हरला घरात डांबून ठेवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याशिवाय पुरावे नष्ट केल्याचा देखील त्यांच्यावर आरोप आहे.
विशाल अग्रवालने रक्ताचा रिपोर्ट बदलण्यासाठी देखील ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना पैसे दिल्याचा देखील आरोप आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेने दोन डॉक्टरांना देखील अटक केली आहे.