गोकुळचा निकाल जाहीर, महायुतीचा मोठा विजय, निकाला आधीच हसन मुश्रीफ, महाडिक यांची घोषणा

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीसाठी मतदान सुरू असतानाच राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ आणि धनंजय महाडिक यांनी महायुतीच्या उमेदवाराला विजयी घोषित करत अभिनंदन केले आहे. निकालाआधीच केलेल्या या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

गोकुळचा निकाल जाहीर, महायुतीचा मोठा विजय, निकाला आधीच हसन मुश्रीफ, महाडिक यांची घोषणा
hasan mushrif
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 10, 2026 | 2:33 PM

गेल्या 15 दिवसापासून गोकुळ दूध संघावरून राजकारण सुरू आहे. गोकुळवर सरकारने चार सदस्यांची नियुक्ती केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण अखेर तापलं आहे. गोकुळचं प्रकरण थेट कोर्टात गेल्यानंतर आज गोकुळचा अध्यक्ष निवडीसाठी मतदान होत आहे. हे मतदान सुरू असतानाच राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ आणि धनंजय महाडिक यांनी गोकुळचा निकाल जाहीर केला आहे. इतकेच नव्हे तर महायुतीचा उमेदवार जिंकल्याचं सांगत नव्या अध्यक्षाला शुभेच्छाही दिल्या आहेत. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मुश्रीफ आणि महाडिक यांना इतकी काय घाई झालीय? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

महायुतीच्या नेत्यांनी आज कोल्हापुरात विराट मोर्चाचं आयोजन केलं होतं. यावेळी हसन मुश्रीफ यांनी भाषण केलं. हे भाषण करताना त्यांनी सुरुवातीलाच महायुतीच्या उमेदवाराला विजयाच्या शुभेच्छा दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. राजेश पाटील महायुतीचे चेअरमन म्हणून निवडून आले आहेत. त्यांचा निकाल आणि माझ्या हातात माइक येणं ही योगायोगाची गोष्ट आहे. राजेश पाटील यांचं अभिनंदन करतो, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

Loading...

मुख्यमंत्र्यांचा अपमान केला..

वर्चस्व वादावरून आम्हाला या निवडणुकीत सूर गवसला नाही. 5000 मते महायुतीला पडली आहेत. 5000 मतांची निवडणूक आणि राज्याचे परिवर्तन करायला निघाले आहेत, असं सांगतानाच मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. आम्ही गोकुळवर ताबा मिळवण्यासाठी अध्यादेश काढला नाही. बंटी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचा अपमान केला. पायताण, यम आणि रेडा दाखवण्याचा प्रयत्न केला. आम्ही सर्व संयमानं घेतलं. आमचा अध्यक्ष झाला तरी पण आम्ही उन्माद करणार नाही, असं मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं.

कालची सभा शेवटची

लोकशाहीचा बचाव करण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं. पण त्यांचाच अपमान करण्याचे काम काँग्रेसने केलं आहे. माझा हात धरायला तुम्ही एवढे मोठे झाला नाहीत. आमच्यामुळे तुम्ही विधान परिषदेत सदस्य झालात. आम्ही जर पुढाकार घेतला नसता तर तुम्ही राज्यमंत्री झाला नसता. माझा आणि विनय कोरे यांचा हात धरून ते विधिमंडळात गेले. ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी असतात, असा टोलाही त्यांनी लगावला. कोण व्हिलन आहे आणि कोण नाही हे 2029 मध्ये समजेल. कालची बंटी पाटीलची सभा शेवटची सभा होती, असा दावाही त्यांनी केला.

महाडिक तेच म्हणाले…

दरम्यान, धनंजय महाडिक यांनीही राजेश पाटील हेच गोकुळचे अध्यक्ष म्हणून निवडून आल्याचा दावा केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us