पुण्यातल्या विद्यार्थी आंदोलनाचं काय होणार? पडळकर म्हणतात..
राज्य सरकारने एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकल्लानंतर महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी आज दिवसभर आंदोलन केलं (Gopichand Padalkar on Pune Students protest for MPSC exam).

पुणे : राज्य सरकारने एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकल्लानंतर महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी आज दिवसभर आंदोलन केलं. पुण्यात विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन बघायला मिळालं. विशेष म्हणजे या आंदोलनात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे सहभागी झालेले बघायला मिळाले. या सर्व गदारोळानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमपीएससीची परीक्षा पुढच्या आठवड्यात होईल आणि त्याचं वेळापत्रक उद्या जाहीर होईल, असं स्पष्ट केलंय. त्यामुळे पुण्यात सुरु असलेलं आंदोलन विद्यार्थी मागे घेतील का? याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही आंदोलनात सहभागी असलेल्या गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली (Gopichand Padalkar on Pune Students protest for MPSC exam).
गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?
“मी आता विद्यार्थ्यांसोबत आहे. हा विषय विद्यार्थ्यांचा आहे. राज्यातील काण्याकोपऱ्यातून इथे हजारो विद्यार्थी आले आहेत. मी विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहे. विद्यार्थी म्हणाले इथेच थांबायचं तर इथेच थांबणार आहे. मी विद्यार्थ्यांच्या सोबत आहे. विद्यार्थ्यांची जी भूमिका असेल ती आमची असेल. येत्या 14 तारखेला परीक्षा व्हावी हाच आमचा आग्रह आहे. मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका जाहीर केली आहे ती विद्यार्थ्यांच्या हिताची नाही”, अशी भूमिका पडळकर यांनी मांडली.
“तुम्ही विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळताय. परीक्षा जाहीर केल्यानंतरही तुमचं नियोजन नसेल, तुमचा ढिसाळ कारभार असेल तर हे सरकार विद्यार्थ्यांना गंभीरतेने घेत नाही हे स्पष्ट होतंय. जे विद्यार्थी उद्याचे अधिकारी होणार आहेत त्यांच्याबाबत हे सरकार गंभीर नाही. हे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरुन कळालं. तुम्ही राज्याचे सर्वेसर्वा आहात”, असं पडळकर म्हणाले.
“मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मी विद्यार्थ्यांची भूमिका मांडतोय. सगळे विद्यार्थी परीक्षा द्यायला इथे आले आहेत. दोन मुलांनी आत्महत्या केली. त्याची जबाबदारी कोण घेणार?”, असा सवाल पडळकर यांनी केला.
“मी कोणताही विद्यार्थी भडकेल असं वक्तव्य केलेलं नाही. मी विद्यार्थ्यांसोबत आहे. मी पुण्यात पत्रकार भवनला आलो होतो. आमच्या कोकणातल्या कार्यकर्ता मित्राच्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला आलो होतं. तिथे आल्यानंतर मला काही विद्यार्थी भेटले. त्यांनी राज्य सरकारने परीक्षा पुढे ढकल्याचं सांगितलं. त्यामुळे कार्यक्रमानंतर अहिल्यादेवी अभ्यासिकेत आलो. त्यानंतर पाच मिनिटात रस्त्यावर बसलो”, असं पडळकर यांनी सांगितलं.
“याला राजकीय वळण लागण्याचं कारण नाही. विद्यार्थी माझी जबाबदारी आहेत. जर सरकारला राजकारण वाटतंय तर निर्णय घ्या, १४ तारखेला परीक्षा घ्या. मी इथून निघून जाईल”, असं पडळकर म्हणाले (Gopichand Padalkar on Pune Students protest for MPSC exam).
