अविनाश भोसलेंना हायकोर्टाचा दणका, ईडीच्या चौकशीला हजर राहण्याचे आदेश

| Updated on: Jun 15, 2021 | 3:48 PM

अविनाश भोसले यांच्या याचिकेवर येत्या 24 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे. (Avinash Bhosale ED inquiry)

अविनाश भोसलेंना हायकोर्टाचा दणका, ईडीच्या चौकशीला हजर राहण्याचे आदेश
अविनाश भोसले
Follow us on

मुंबई : पुण्यातील बांधकाम- हॉटेल व्यावसायिक अविनाश भोसले यांना हायकोर्टाने चांगलाच दणका दिला आहे. अविनाश भोसले यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जाव लागेल, असे आदेश हायकोर्टाने दिले आहे. त्यामुळे येत्या 17 फेब्रुवारीला अविनाश भोसले यांना ईडीच्या कार्यालयात हजर राहावं लागणार आहे. मात्र त्यांच्यावर कोणतीही कडक कारवाई केली जाणार नाही, अशी माहिती ईडीचे वरिष्ठ वकील हितेंन वेनेगावकर यांनी दिली आहे. (HC Order Avinash Bhosale To appear for ED inquiry)

अविनाश भोसले यांच्या याचिकेवर येत्या 24 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे. तोपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कडक कारवाई करणार का? असा सवाल कोर्टाने उपस्थित केला होता. मात्र त्यावेळी ईडीचे वरिष्ठ वकील हितेंन वेनेगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसले यांच्यावर कडक कारवाई करणार नाही, असं कोर्टाला तोंडी सांगितले.

भोसले यांची ईडीविरोधात याचिका 

बिल्डर अविनाश भोसले यांच्या विरोधात पुणे येथील जमिनीबाबत गुन्हा दाखल आहे. याबाबत आता ईडीने मनी लाँडरिंगप्रकरणी ही तपास सुरू केला आहे. या प्रकरणी ईडीने 11 फेब्रुवारीला भोसले यांच्याशी संबंधित चार ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. यावेळी अविनाश भोसले याचा मुलगा अमित भोसले याला ताब्यात घेऊन त्याची चार तास चौकशी केली होती.

या चौकशीनंतर 12 फेब्रुवारीला अविनाश भोसले आणि अमित भोसले यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, हे दोघेही चौकशीसाठी हजर झाले नाहीत. यानंतर भोसले यांनी ईडीविरोधात गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका केली होती. आज त्यावर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठात सुनावणी झाली.

आम्हाला सहकार्य करावं, ईडीच्या वकिलांचा युक्तिवाद 

यावेळी ईडीचे वकील हितेंन वेनेगावकर यांनी केलेल्या युक्तीवादानुसार, अविनाश भोसले याला तीन वेळा समन्स बजावलं होतं. त्यात चौकशीसाठी हजर राहावे असेही सांगितले होते. मात्र ते चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. ते आता डायरेक्ट कोर्टात गुन्हा दाखल करण्यासाठी आले आहेत. आम्हाला चौकशी करायची आहे. त्यांनी आम्हाला सहकार्य करावं. ते सहकार्य करत नाहीत, अशी माहिती हितेन वेनेगावकर यांनी कोर्टाला दिली.

हा मुद्दा ग्राह्य धरत अविनाश भोसले यांना ईडीच्या चौकशीला समोर जाण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता येत्या 17 फेब्रुवारीला अविनाश भोसले याला ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे. तर अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले यानेदेखील अशाच पद्धतीची याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या 16 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.

कोण आहेत अविनाश भोसले?

  • रिक्षावाला ते रियल इस्टेट किंग असा अविनाश भोसले यांचा प्रवास आहे.
  • अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत.
  • कोट्यवधी रुपयांचा एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत.

नगर जिल्ह्यातल्या संगमनेर शहरातून अविनाश भोसले रोजगाराच्या शोधात पुण्यात आले. त्यांनी रिक्षाचालक म्हणून सुरुवात केली. पुण्यातील रास्ता पेठ भागात भाड्याच्या घरात राहून अविनाश भोसले यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केला.  अल्पावधीत रिक्षा भाड्याने देण्याचा व्यवसाय ते करु लागले. त्यानंतर अविनाश भोसले यांची ओळख बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींशी आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदारीच्या माध्यमातून काम करणाऱ्यांशी झाली. यानंतर अविनाश भोसले यांनी रस्ते तयार करण्याची लहान-मोठी कंत्राटं घेतली. (HC Order Avinash Bhosale To appear for ED inquiry)

संबंधित बातम्या : 

ईडीनं छापा टाकलेले अविनाश भोसले कोण आहेत? रिक्षा चालक ते रिअल इस्टेटचे बादशाह, थक्क करणारा प्रवास, वाचा सविस्तर

रिअल इस्टेट किंग अविनाश भोसले यांची 10 तास चौकशी; ईडी कार्यालयातून बाहेर