ईडीनं छापा टाकलेले अविनाश भोसले कोण आहेत? रिक्षा चालक ते रिअल इस्टेटचे बादशाह, थक्क करणारा प्रवास, वाचा सविस्तर

विदेशी चलन प्रकरणात अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. (ED raids in Avinash Bhosale Pune Office)

ईडीनं छापा टाकलेले अविनाश भोसले कोण आहेत? रिक्षा चालक ते रिअल इस्टेटचे बादशाह, थक्क करणारा प्रवास, वाचा सविस्तर
अविनाश भोसले

पुणे : पुण्यातील बांधकाम- हॉटेल व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या पुण्यातील ABIL हाऊस या कार्यालयावर ईडीने धाड टाकली आहे. फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून विदेशी चलन प्रकरणात अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. (ED raids in Avinash Bhosale Pune Office)

ईडीच्या अधिकाऱ्यांकडून भोसले यांच्या विद्यापीठ रोडवरील AIBL या कार्यालयात सकाळपासून कागदपत्रांची तपासणी सुरु आहे. आयबीच्या परवानगीविना विदेशी बँकेतील खात्यावर 500 कोटी कसे जमा झाले, असा संशय ईडीला आहे. त्यासंबंधी ईडी अधिक तपास करत आहे. याआधीही नोव्हेंबरमध्ये अविनाश भोसले यांची ईडीने चौकशी केली होती. नोव्हेंबरमध्ये ईडीने भोसले यांना मुंबईत चौकशीसाठी बोलवून घेतलं होतं. तेव्हा ईडीच्या अधिकाऱ्यानं त्यांची तब्बल दहा तास चौकशी केली होती.

🛑कोण आहेत अविनाश भोसले?🛑

  • रिक्षावाला ते रियल इस्टेट किंग असा अविनाश भोसले यांचा प्रवास आहे.
  • अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत.
  • कोट्यवधी रुपयांचा एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत.

नगर जिल्ह्यातल्या संगमनेर शहरातून अविनाश भोसले रोजगाराच्या शोधात पुण्यात आले. त्यांनी रिक्षाचालक म्हणून सुरुवात केली. पुण्यातील रास्ता पेठ भागात भाड्याच्या घरात राहून अविनाश भोसले यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केला.  अल्पावधीत रिक्षा भाड्याने देण्याचा व्यवसाय ते करु लागले. त्यानंतर अविनाश भोसले यांची ओळख बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींशी आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदारीच्या माध्यमातून काम करणाऱ्यांशी झाली. यानंतर अविनाश भोसले यांनी रस्ते तयार करण्याची लहान-मोठी कंत्राटं घेतली.

पुण्यातील बाणेर भागात अविनाश भोसले यांनी उभारलेला व्हाईट हाऊस हा बंगला डोळे दिपवणार आहे. हाऊसच्या टेरेसवर अविनाश भोसलेंच्या मालकीचे हेलिकॉप्टरही आहेत. रिक्षा व्यवसाय ते स्वतःच्या मालकीची हेलिकॉप्टर इथपर्यंतचा प्रवास अवघ्या काही वर्षांचा आहे. अविनाश भोसले यांचा हा प्रवास सर्वांच्याचं दृष्टीनं अचंबित करणारा आहे.

दरम्यान भोसले यांच्यावर ईडीने यापूर्वी फेमा कायद्यांतर्गत कारवाई करीत 1 कोटी 83 लाखांचा दंड केला होता. 2007 मध्ये अमेरिका आणि दुबई दौरा करुन भारतात येताना परकीय चलन आणि महागड्या वस्तू कस्टम ड्यूटी न भरता चोरून आणल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली होती. त्यांचा पासपोर्टही जप्त करण्यात आला होता. शुक्रवारी त्यांची मुंबईत चौकशी सुरू होती. आता पुण्यातल्या कार्यालयात ईडीने चौकशी सुरु केली आहे. 2017 साली इन्कम टॅक्स विभागाने अविनाश भोसले यांच्या घरी छापा टाकल्यानंतर ते पुन्हा चर्चेत आले होते. (ED raids in Avinash Bhosale Pune Office)

संबंधित बातम्या :

रिअल इस्टेट किंग अविनाश भोसले यांची 10 तास चौकशी; ईडी कार्यालयातून बाहेर

राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या पत्नीला ईडीची नोटीस : सूत्र