Income Tax: राष्ट्रवादीचे दिग्गज नेते संजीवराजे यांच्याकडे सुरु असलेली आयकर तपासणी पाच दिवसांनंतर संपली, अधिकाऱ्यांनी जाताना…
Sanjeevraje Naik Nimbalkar : संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी या आयकर छाप्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले की, ही पॉलिटिकल रेड होती किंवा नव्हती हे मला माहीत नाही. मात्र सध्याचा काळ असा आहे की कशाला पॉलिटिकल म्हणायचे? हा अत्यंत अवघड प्रश्न आहे.

Sanjeevraje Naik Nimbalkar : सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, फलटण तालुक्यातील दिग्गज नेते, रामराजे नाईक यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांची आयकर विभागाकडून सुरू असलेली चौकशी अखेर पाचव्या दिवशी संपली. बुधवारी आयकर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील निवासस्थानी, पुण्यातील निवासस्थानी, गोविंद मिल्क डेअरीवर तपासणी सुरु केली होती. संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करण्यापूर्वीच आयकर विभागानं छापा टाकला. आयकर विभागाची ही छापेमारी निंबाळकर कुटुंबियांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
अजित पवार यांच्या पक्षात जाण्यापूर्वीच छापे
आयकर विभागाचे पथक ५ फेब्रुवारी रोजी संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहे. पाच दिवसांपासून संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी आणि कार्यालयात आयकर विभागाने तपासणी सुरु केली. त्यानंतर त्यांचे समर्थक देखील ठिय्या मांडून होते. संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. आता येत्या काही दिवसांमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. त्यापूर्वीच हा छापा टाकण्यात आला आहे.
काय म्हणतात संजीवराजे नाईक
संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी या आयकर छाप्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले की, ही पॉलिटिकल रेड होती किंवा नव्हती हे मला माहीत नाही. मात्र सध्याचा काळ असा आहे की कशाला पॉलिटिकल म्हणायचे? हा अत्यंत अवघड प्रश्न आहे. पाच तारखेपासून ही चौकशी केली. आयटी विभागाच्या अधिकाऱ्यांना जे पाहिजे होते ते त्यांनी पाहिले. बँकेचे लॉकर्स पाहिले.




गेले दोन दिवस आम्ही पेपरवर्क करत आहोत. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी 2 लाख 35 हजाराची कॅश आणि काही दागिने हे जाताना मला परत दिलेले आहेत. तसेच गोविंद मिल्क डेअरीत आणि माझ्या घरातून काहीही जप्त केलेले नाही. आमच्या डेअरीचे कामकाज अत्यंत समाधानकारक असल्याचे आयटी अधिकाऱ्यांना दिसून आलेले आहे.