
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानसेवा पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. इंडिगो एअरलाईन्सच्या विमानांच्या वेळापत्रकात झालेल्या मोठ्या गोंधळामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सलग दुसऱ्या दिवशी इंडिगो एअरलाईन्सच्या नियोजनशून्य कारभाराचा आणि पायलट क्रू कर्मचाऱ्यांच्या तीव्र कमतरतेचा प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. पुण्यातू गेल्या दोन दिवसांत इंडिगोची १६ हून अधिक उड्डाणे रद्द झाली. तर १९ हून अधिक विमानांना प्रचंड विलंब झाला. या गोंधळाचे मूळ कारण विमानतळ प्रशासनाच्या कमी क्षमतेपेक्षा इंडिगोच्या अंतर्गत व्यवस्थापनातील गंभीर त्रुटी असल्याचे समोर आले आहे.
पुणे विमानतळावर विमाने उभी करण्याची क्षमता केवळ १० विमानांची आहे. मात्र, इंडिगोच्या गोंधळामुळे वेळेवर क्रू न मिळाल्याने कंपनीची ९ विमाने तासनतास पार्किंग बेमध्ये उभी आहेत. विमानतळाचे संचालक संतोष धोके यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिगोच्या अनेक विमानांना चालक दलाच्या उपलब्धतेसाठी जास्त वेळ लागत असल्याने पार्किंग बे दीर्घकाळ व्यापले जात आहेतय ज्यामुळे हा गोंधळ वाढला आहे. पार्किंगची जागा उपलब्ध नसल्याने इतर एअरलाईन्सची विमानेही वेळेवर उतरू शकली नाहीत, परिणामी काही विमानांना मुंबईला वळवावे लागले.
सकाळची नागपूरला जाणारी इंडिगोची फ्लाईटही उशिरा सुरु झाली. विमानांचे वेळापत्रक कोलमडल्याने तिकिटे रद्द करण्यासाठी आणि पुढील माहिती मिळवण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. परिणामी, प्रवाशांना त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा खूप उशिरा प्रवास सुरू करावा लागत आहे. तसेच काही विमानांची तिकीट रद्द करण्यात आली आहेत. पुण्याहून जोधपूरला लग्नाच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या एका प्रवाशाने याबद्दल संताप व्यक्त केला आहे.
“आम्ही पुण्यावरुन जोधपूरला जात होतो. पण इंडिगोने फ्लाईट रद्द झाल्याचा आम्हाला कोणताही मेसेज दिलेला नाही. आम्ही सकाळी ५ वाजता निघालो होतो आणि माझ्यासोबत माझी पत्नीही आहे. कालपण आम्ही चौकशी केली तेव्हा त्यांनी आज चालू होईल असे सांगितले. पण आजही फ्लाईट कॅन्सल झाली. कालच हे सांगितलं असतं तर आम्ही बस किंवा ट्रेनने जोधपूरला गेलो असतो. आजपासून लग्नाचे सर्व कार्यक्रम सुरु होत आहेत. त्यामुळे कमीत कमी गाईडलाईन तरी द्यायला हवी होती, असे त्या प्रवाशाने म्हटले.
इंडिगोच्या या ढिसाळ नियोजनाचा फटका खासदार अमोल कोल्हे यांनाही बसला आहेत. खासदार अमोल कोल्हे यांनी इंडिगोच्या सेवेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. देशांतर्गत विमानसेवेच्या ‘सावळ्या गोंधळा’मुळे फ्लाईटला २ तास उशीर अन् मग ३ तासांनी फ्लाईट कॅन्सल..! सिस्टीम वेळ वाया घालवत असली तरी मी नाही! या अनपेक्षितपणे मिळालेल्या ‘निवांत वेळेत’ एक महत्त्वाचं लेखन पूर्ण केलं. ३ तासांनी फ्लाईट कॅन्सल झाली याचा मनस्ताप आहेच, पण होऊ दिला नाही याचं जास्त बरं वाटतंय..! इंडिगोकडून ही अपेक्षा नव्हती… यापुढे इंडिगोचा प्रवास नकोच..! जय शिवराय, असे अमोल कोल्हेंनी पोस्ट करत म्हटले आहे.
तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावरुन थेट केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. इंडिगोचा हा गोंधळ हे या सरकारच्या मक्तेदारी मॉडेलचे परिणाम आहेत. पुन्हा एकदा, विलंब, विमानाचे वेळापत्रक रद्द होणे आणि हतबलता याचे परिणाम सामान्य भारतीयांना भोगावे लागत आहेत. भारताला प्रत्येक क्षेत्रात निष्पक्ष स्पर्धा हवी आहे, जुळवलेल्या मक्तेदारीची गरज नाही, असे राहुल गांधी म्हणाले. दरम्यान पुणे विमानतळावरील इंडिगोच्या गोंधळामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची गरज असल्याचे प्रवाशांचे म्हणणं आहे.