
पुणे | 1 सप्टेंबर 2023 : राज्यात यंदा मान्सूनने चांगलीच हुलकावणी दिली आहे. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात फक्त चार दिवस पाऊस झाला. यामुळे राज्यातील धरणांमधील जलसाठा मागील वर्षांपेक्षा यंदा 20 टक्के कमी आहे. सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस न झाल्यास यंदा राज्यात दुष्काळाचे सावट असणार आहे. पुणे जिल्ह्यातील 54 महसूल मंडळात 22 ते 35 दिवसांचा पावसाचा खंड पडला आहे. यामुळे या ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती आहे. राज्यातील धरणांमध्ये 1,026.6 TMC पाणी मागील वर्षी होता. यावर्षी हा साठा 730 TMC आहे.
राज्यात औरंगाबाद विभागात सर्वात कमी जलसाठा आहे. सध्या या विभागात 37 टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी या विभागात 86 टक्के जलसाठा आहे. पुणे विभागात 76 टक्के जलसाठा झाला आहे. मागील वर्षी 95 जलसाठा होता. यंदा कोकण विभागाची परिस्थिती चांगली आहे. कोकण विभागात मागील वर्षीपेक्षा जास्त जलसाठा आहे. मागील वर्षी कोकणात 90 टक्के जलसाठा होता. तो यावर्षी 92 टक्के आहे.
मराठवाड्यासाठी महत्वाचा असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पात 33 टक्के जलसाठा आहे. माजलगाव प्रकल्पात 13 टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी दोन्ही प्रकल्पात 50 टक्के जलसाठा होता. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रात केवळ 27.60 TMC पाणीसाठा आहे. पुणे परिसरात गेल्या तीन महिन्यात केवळ 94 टक्केच धरणे भरली आहे. दरवर्षी ऑगस्ट अखेरपर्यंत पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे चारही धरण 100 टक्के भरतात. परंतु या वर्षी पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण साखळी क्षेत्रातील एकही धरण 100 टक्के भरले नाही. यामुळे पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यासंदर्भात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यासंदर्भात शनिवारी २ सप्टेंबर रोजी महत्वाची बैठक होणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीत धरणांमधील जलसाठ्याचा आढावा घेऊन आगाम वर्षभर पाणी पुरेल, या द्दष्टिने नियोजन करावे लागणार आहे. बैठकीत जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.