जरांगेंनी उपचार, पाणी सोडले… विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाले, मला धक्का…
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा पाणी व उपचार घेण्यास नकार देत आमरण उपोषण सुरू केले आहे. यामुळे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना धक्का बसला असून, त्यांनी जरांगेंना असे पाऊल न उचलण्याचे आवाहन केले आहे. सरकार मराठा आरक्षणावर कायदेशीर कार्यवाही करत असून, ओबीसींच्या हक्कांना धक्का लागणार नाही याची ग्वाही विखे पाटलांनी दिली.

मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या आठ दिवसापासून आंदोलन सुरू केलं आहे. सुरुवातीला आमरण उपोषण केल्यानंतर त्यांनी पाणी घेण्यास आणि सलाईन लावण्यास परवानगी दिली होती. पण सरकारकडून आठ दिवसात कोणतीही कार्यवाही न झाल्याने जरांगे चांगलेच संतापले आहेत. त्यामुळे त्यांनी कालपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं आहे. त्यांना पाणी आणि वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे. जरांगे यांच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे यांच्या या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जरांगे यांच्या निर्णयाने मला धक्काच बसला, असं विखेट पाटील यांनी म्हटलं आहे.
राधाकृष्ण विखे पाटील हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. सरकारने त्यांच्या सर्वच मागण्यांची दखल घेतली आहे. कायदेशीर बाबी तपासून कार्यवाही सुरू आहे. न्यायालयीन प्रक्रियेत निर्णय टिकावा यासाठी काळजी घेऊन अंमलबजावणी करण्यात येत आहे. परवा जरांगे यांची भेट घेतली होती. त्यांच्यासोबत चर्चा झाली. मात्र त्यांनी आज उपचारास नकार दिला. याचा मला धक्का बसला.
त्यांनी असं पाऊल उचलू नये. वेळ पडली तर मी आणि अधिकारी पुन्हा त्यांची भेट घेऊ, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का नाही
यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा नेहमी आदर आहे. ओबीसींच्या हक्काला कुठेही धक्का लागणार नाही, ही आमची भूमिका आहे. कोणत्याही अन्य धर्माच्या आरक्षणाला धक्का न लावता शासन कार्यवाही करणार आहे, अशी माहिती विखे पाटील यांनी दिली.
जरांगे यांच्या तोंडून कधी कधी त्रास देणारे किंवा अनावधानाने काही शब्द निघतात. मात्र ते समाजासाठी बोलत असतात. त्यामुळे त्यात व्यक्तिगत राग मानायचं कारण नाही. आजपासून शिंदे समितीचा मराठवाड्यात दौरा सुरू झाला आहे. या दौऱ्यामुळे अनेक प्रश्न निकाली निघतील, असंही ते म्हणाले.
समान धोरण असावं
यावेळी त्यांनी डीजेबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या प्रश्नावर चर्चा करून सामोपचाराने निर्णय काढला पाहिजे. हिंदूंचे सण आले की बंदीचा विषय येतो. इतर समाजाच्या वेळी चर्चा होत नाही. या दुजाभावाची चीड समाजात आहे. यासाठी समान धोरण आखण्याची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं.