meera borwankar | दोन मोठ्या राजकीय नेत्यांकडून पुणे शहरात दंगल घडवण्याचा प्रयत्न…माजी पोलीस आयुक्तांचा दावा

meera borwankar | पुणे येथील येरवडा जमीन प्रकरणात अजित पवार यांचे नाव घेतल्यानंतर आणखी एक धक्कादायक गौप्यस्फोट माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी केला आहे. पुणे शहरात दंगल घडवण्याचा प्रयत्न दोन नेत्यांनी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

meera borwankar | दोन मोठ्या राजकीय नेत्यांकडून पुणे शहरात दंगल घडवण्याचा प्रयत्न...माजी पोलीस आयुक्तांचा दावा
| Updated on: Oct 20, 2023 | 9:24 AM

योगेश बोरसे, पुणे | 20 ऑक्टोंबर 2023 : पुणे येथील माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर सध्या चर्चेत आल्या आहेत. मीरा बोरवणकर याचे ‘मॅडम कमिशनर’ हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले. या पुस्तकातून त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. कसाबपासून अजित पवार यांच्यापर्यंतच्या अनेक गोष्टींचा समावेश त्यांनी या पुस्तकात केला आहे. अजित पवार यांच्यासंदर्भातील 2010 मधील एका प्रकरणाचा उल्लेख मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकातून केला आहे. त्यात अजित पवार यांचे नाव न घेता येरवडा येथील पोलिसांची असलेली तीन एकर जमीन अजित पवार यांनी एका खासगी बिल्डरवर दिल्याचा आरोप केला आहे. आता आणखी दोन नेत्यांवर दंगल घडवण्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पुणे शहरात दंगली घडवण्याचा आरोप

पुणे शहरात दंगल घडवून आणण्यासाठी दोन राजकीय नेत्यांनी चिथावणी दिली, असा दावा मीरा बोरवणकर यांनी पुस्तकात केला आहे. पुण्यात लाल महलातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविल्यावर शहराच्या काही भागांमध्ये हिंसाचार घडवून आणण्यासाठी ही चिथावणी दिल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. नीलम गोऱ्हे आणि मिलिंद नार्वेकर यांची नावे त्यांनी घेतली आहे. नीलम गोऱ्हे सध्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. तर मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरे यांच्या जवळचे नेते आहेत.

कोणत्या आधारावर केला दावा

मीरा बोरवणकर यांनी मिलिंद नार्वेकर आणि नीलम गोऱ्हे यांच्यावर केलेल्या आरोपासंदर्भात मीरा बोरवणकर यांनी म्हटले आहे की, दूरध्वनीवरील संभाषणातून ही बाब पुढे आली होती. पुणे शहरात हिंसाचार घडवून आणण्यासाठी चिथावणी दिल्याचे त्या संभाषणातून स्पष्ट होत असल्याचे मीरा बोरवणकर यांनी पुस्तकात म्हटले आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी आपले ऐकले नाही

नीलम गोऱ्हे आणि मिलिंद नार्वेकर यांचे हे प्रकरण समोर आल्यानंतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश आपण कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिले. मात्र ते फारसे उत्सुक दिसले नाहीत. माझ्या अनेक वर्षांच्या कारकीर्दीत प्रथमच माझ्या आदेशाचे कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून पालन केले गेले नव्हते, असे बोरवणकर यांनी पुस्तकात म्हटले आहे.