कुणी चक्कर येऊन पडलं, कुणाला अटॅक आला, तर कुणाचा… 48 तासात 8 जणांचा मृत्यू झाला कसा? गूढ वाढलं

पुणे-मुंबई महामार्गावरील फुगेवाडीत 48 तासांत 8 जणांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. नैसर्गिक, हृदयविकार आणि चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी, दारूचे व्यसन नसलेल्या चार जणांच्या मृत्यूमुळे गूढ वाढले आहे.

कुणी चक्कर येऊन पडलं, कुणाला अटॅक आला, तर कुणाचा... 48 तासात 8 जणांचा मृत्यू झाला कसा? गूढ वाढलं
Pune's Fugewadi
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: May 29, 2026 | 12:16 AM

पुणे-मुंबई महामार्गावरील फुगेवाडी भागात एकाच दिवशी 8 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. गावातील आझाद चौकातील शोककुळाच्या फलकावर 8 जणांच्या निधनाची माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर ही घटना समोर आली. गेल्या 48 तासात हे मृत्यू झाला आहे. कुणाचा नैसर्गिक मृत्यू झाला, कुणाला हार्ट अटॅक आला तर कुणी चक्कर येऊन पडल्याने मृत पावले. मृतांपैकी चार जणांना दारूचं व्यसन नव्हतं. मग त्यांचा मृत्यू झाला कसा? असा सवाल केला जात आहे. अचानक झालेल्या या मृत्यून गूढ निर्माण झालं आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. अधिक तपास केल्यानंतर प्राथमिक तपासाअंती या सर्व घटना स्वतंत्र असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. एकाचवेळी 8 जणांचे मृत्यू झालेले नाही. वेगवेगळ्यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी 8 जणांचे मृत्यू झाल्याने कोणत्याही मृत्यूचा परस्पर संबंध नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग फुगे (57) यांचा मृत्यू नैसर्गिक झाला आहे. तर विजय राठोड (31) आणि राजेंद्र राठोड (34) या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा, असा अंदाज आहे.

राजेंद्र राजपूत (51) यांचा बाथरूममध्ये चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला, तर अकबर पठाण (52) यांना गेल्या 15 वर्षांपासून दारूचे व्यसन होते होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू दारूमुळे झाला असण्याची शक्यता आहे. या 8 पैकी 4 जणांना दारूचे कोणतेही व्यसन नव्हते आणि कोणत्याही नातेवाईकाने हातभट्टीची दारू प्यायल्याची तक्रार केलेली नाही, असे दापोडी पोलिसांनी सांगितले. या सर्व प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी करत असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे अचूक कारण स्पष्ट होईल, अशी माहिती दापोडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांनी दिली.

नैसर्गिक मृत्यू

पांडुरंग सदाशिव फुगे हे वयोवृद्ध असून नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार त्यांचा मृत्यू नैसर्गिकपणे झाला आहे. नातेवाईकांनी कोणत्याही दवाखान्यात त्यांना दाखल केलं नव्हतं. तसेच त्यांना दारूचं कुठलंही व्यसन नव्हतं. त्याचप्रमाणे फुगे यांच्या नातेवाईकांची कुठलीही तक्रार नाही. त्यांनी मृत्यू मृतदेह दुपारच्या सुमारासच अंत्यसंस्कारासाठी नेला होता.

भाऊ गेल्याचा धक्का…

विजय प्रकाश राठोड आणि राजेंद्र प्रकाश राठोडहे दोन्ही सख्खे भाऊ आहेत. विजय राठोड हा मुव्हर्स अँड पॅकर्स कंपनीत कामाला आहे. काल दुपारच्या सुमारास विश्रांतवाडी येथे पॅकेजिंग काम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे सोबतच्या कामगारांनी त्यांना खडकीच्या कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याला बघायला त्याचे वडील आणि भाऊ राजेंद्र राठोड हे रात्री उशिरापर्यंत दवाखान्यात होते.

सकाळी सातच्या सुमारास विजय यांच्या मृत्यूची बातमी कळाल्याने भाऊ राजेंद्र यास अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे राजेंद्र यांना औंध येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. तिथे उपचार सुरू असतानाच त्यांना मयत घोषित करण्यात आले. दोन्ही भावांचा मृत्यू प्रथमदर्शनी हृदयविकाराने झाला असावा असा अंदाज आहे. वडिलांच्या आणि भावांच्या जबाबानुसार विजय आणि राजेंद्र या दोघांनाही दारूचे व्यसन नव्हते.

बाथरूममध्ये चक्कर आली…

राजेंद्र राजपूत हे बाथरूममध्ये चक्कर येऊन पडले होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांना दारूचे व्यसन नव्हते. तर अकबर पठाण यांचा दुपारी 12.30 वाजता मृत्यू झाला. अकबर यांना गेल्या 15 वर्षापासून दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्यांचा त्यात मृत्यू झाला असावा असं सांगितलं जात आहे. दरम्यान, या प्रकरणाचा दापोडी पोलीस अधिक तपास करत आहेत. विशेष म्हणजे 48 तासात आठ मृत्यू झाले असले तरी याबाबत कोणतीही फिर्याद आलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

मृतांची नावे

१) पाडुरंग फुगे

२) विजय प्रकाश राठोड

३) राजेंद्र प्रकाश राठोड

४) राजू रजपुत

५) अकबर पठाण

६) बाबा शेख

७) आनंद देसाई

८) आनंद निकाळजे

दोघांची प्रकृती चिंताजनक

१) सुभाष डिगीकर – मेडी पॉईंट हॉस्पिटल

२) अक्षय अवसरमल – यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us