आमदार सुनील टिंगरे यांच्या समर्थनार्थ रुपाली पाटील यांची फेसबुक पोस्ट, म्हणाल्या, ‘त्यांनी कोणताही राजकीय दबाव…’

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सुनील टिंगरे यांच्या समर्थनार्थ फेसबुकवर भूमिका मांडली आहे. "आमदार सुनील भाऊने कोणत्याही कायदेशीर कारवाईत हस्तक्षेप केला नाही. तसेच कुठलाही राजकीय दबाव आणलेला नाही", असं रुपाली पाटील म्हणाल्या आहेत.

आमदार सुनील टिंगरे यांच्या समर्थनार्थ रुपाली पाटील यांची फेसबुक पोस्ट, म्हणाल्या, त्यांनी कोणताही राजकीय दबाव...
सुनील टिंगरे यांच्या समर्थनार्थ रुपाली पाटील यांची फेसबुक पोस्ट
| Updated on: May 21, 2024 | 10:53 PM

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावरही सोशल मीडियावर टीका केली जात आहे. या टीकेवर सुनील टिंगरे यांच्याकडून वारंवार स्पष्टीकरण देण्यात येत आहेत. टिंगरे यांनी पत्रकार परिषद घेऊनही भूमिका मांडली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सुनील टिंगरे यांच्या समर्थनार्थ फेसबुकवर भूमिका मांडली आहे. “पुण्यातील दोन-तीन दिवसांपूर्वी रात्री झालेला भीषण अपघात हा अत्यंत दुर्दैवीच होता. त्यात दोन जण मृत्युमुखी पडले हे अत्यंत भयान आणि धक्कादायक होते. मन सुन्न झाले. मृत्युमुखी पडलेल्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यात आमचा आमदार सुनील भाऊने कोणत्याही कायदेशीर कारवाईत हस्तक्षेप केला नाही. तसेच कुठलाही राजकीय दबाव आणलेला नाही. सोशल मीडियावर जाणूनबुजून चुकीचे सांगून ट्रोल केले जात आहे. त्यासाठी आमदार सुनील भाऊने खुलासा दिला आहे”, असं रुपाली पाटील म्हणाल्या आहेत.

“हो अपघात झाल्यानंतर अपघात झालाय, असा फोन आल्यानंतर आमदार सुनील भाऊ हे पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. पण तोपर्यंत सदर प्रकार कोणलाच माहिती नव्हता. आरोपीचे वडील हे परिचयाचे असून सुनील भाऊ आमदार असल्याने जनता, मतदार असतील, कुटुंब असेल मित्रपरिवार असेल यांना जेव्हा जेव्हा अडचणीत फोन येतात त्यावेळेला सुनील आण्णा हे नेहमीच धावून जातो. पण या मदतीच्यावेळी अपघात झालेले प्रकरण हे पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर कळाले”, असा दावा रुपाली पाटील यांनी केला.

‘अपघाताची भीषण परिस्थिती समजल्यावर सुनील टिंगरे…’

“सदर प्रकार हा समोर आला त्याचवेळी आमदार सुनील भाऊ यांनी जी काय कायदेशीर कारवाई असेल ती पोलिसांनी करावी असे सांगून तिथून बाहेर पडले. जर दबाब आणला असता तर त्या आरोपीवर गुन्हा दाखल झाला नसता. पण अपघाताची भीषण परिस्थिती समजल्यावर ते पोलीस स्टेशनमधून माहिती घेवून बाहेर पडले”, असं रुपाली पाटील म्हणाल्या.

“आमदार सुनील भाऊ टिंगरे यांच्याबद्दल जाणूनबुजून चुकीचे पसरवले जात असून असा कोणताच कायदेशीर कारवाईत हस्तक्षेप, राजकीय दबाव आणलेला नाही आणि आणू शकत नाही. आमदार सुनील भाऊ लोकांच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता आहे आणि त्याने त्याचे काम कार्यरत ठेवावे ही विनंती आहे. सुनील भाऊ सत्य परेशान हो सकता है, पराजित नही”, अशी भूमिका रुपाली पाटील यांनी मांडली आहे.