
ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांची एक ऑडिओ क्लिप सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपपूर्वी माळी समाजाविषयीची त्यांची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. आताही हाके अडचणीत आले आहेत. आपल्याला बदनाम करण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे हाके म्हणाले. तर काही नेते हाकेंच्या समर्थनार्थ समोर आले आहे. त्यांना फसवण्याचा प्रयत्न केल्या जात असल्याचे सांगितले जात आहे.
काय आहे ऑडिओ क्लिप?
प्रा. लक्ष्मण हाके यांना एका व्यक्तीने फोन केला. हा व्यक्ती आपण अकलूजचे असल्याचे सांगत असल्याचे समोर येत आहे. ही व्यक्ती त्यांना पैशांची ऑफर करतो. हाके हे सातत्याने समाजासाठी लढत आहेत. त्यांना फिरण्यासाठी, त्यांचा खर्च करण्यासाठी पैशांची ऑफर देतो. त्यावर हाके सुरुवातीला याची गरज नसल्याचे म्हणतात. नंतर ते ड्रायव्हरचा युपीआय नंबर देताच समोरील तरुणाचा नूर पालटतो. तो लागलीच हाकेंची लाज काढतो आणि त्यांना शिव्या द्यायला सुरुवात करतो. टीव्ही 9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. त्याला दुजोरा देत नाही.
व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर हाकेंची प्रतिक्रिया समोर
ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी या व्हायरल क्लिपनंतर त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “एक व्यक्ती मला पैशाची ऑफर करत होता.ओबीसी लढ्यासाठी मी रात्रंदिवस फिरतोय. मला पाच हजारापासून लोक मदत करतात. तो व्यक्ती पहिल्यांदा जय मल्हार म्हणाला. मी अकलूजचा आहे.त्याची इच्छा अशी होती की मला तुम्हाला मदत करायची. तो म्हणाला की गुगल पे पाठवा मी म्हणालो माझ्याकडे तसं काही नाही. परत तो म्हणाला की दुसऱ्या कोणाचा असेल तर द्या मी ड्रायव्हर कडे फोन दिला. त्याने ते रेकॉर्ड केलं आणि व्हायरल केलं. यात जर माझा काय गुन्हा असेल तर मला अटक करा. जेलमध्ये टाका. मी जर लाचखोरी केली असेल तर मला जेलमध्ये टाका.मला बदनाम करणं याच्या व्यतिरिक्त हे काही नाही.नंबरचा ट्रांजेक्शन काढून बघा त्याच्यामध्ये काय झालं असेल तर मला जेलमध्ये टाका. आम्ही ओबीसीची लढाई लढतोय आम्हाला टाका जेलमध्ये.” असे मत हाके यांनी व्यक्त केलं.
जरांगेवर केली टीका
हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली. जरांगे यांनी अंतरवाली सराटीत बैठक बोलावली आहे. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते कायमच बैठक बोलतात. ती हनुमानाची शेपटी आहे ती कधीच संपणार नाही. यांना आरक्षणाचे तत्त्वच माहीत नाही. या आरक्षणाच्या मागून त्यांची जात वर्चस्वाची भावना आहे, अशी टीका त्यांनी केली.