पिंपरी-चिंचवड गोळीबाराने हादरलं, मित्रांनीच व्यावसायिकाला संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Pune Murder : पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना झपाच्याने वाढल्या आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये मित्रांनी एका व्यावसायिकावर गोळीबार केला आहे. यात 37 वर्षीय नितीन शंकर गिलबिले यांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी-चिंचवड गोळीबाराने हादरलं, मित्रांनीच व्यावसायिकाला संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर
Pune murder news
Updated on: Nov 12, 2025 | 9:41 PM

पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना झपाच्याने वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कोंढव्यात गणेश काळे नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. आता पिंपरी-चिंचवडमध्ये मित्रांनी एका व्यावसायिकावर गोळीबार केला आहे. यात 37 वर्षीय नितीन शंकर गिलबिले यांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड मधील चऱ्होली अलंकापुरम चौकाजवळ ही घटना घडली आहे. या घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नितीन शंकर गिलबिले यांच्यावर मित्रांकडून गोळीबार

समोर आलेल्या माहितीनुसार, अलंकापुरम 90 फुटी रोडवर श्री साई रोड कॅरिअर या ठिकाणी साडेपाच ते 6 वाडण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या ठिकाणी काळ्या रंगाच्या फॉर्च्यूनर गाडीत बसलेले असताना नितीन शंकर गिलबिले यांच्यावर त्यांचेच मित्र अमित जीवन पठारे आणि विक्रांत ठाकुर यांनी गोळीबार केला. या गोळीबारात नितीन गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा आता मृत्यू झाला आहे.

हत्येमागे धक्कादायक कारण

मयत नितीन गिलबिले आणि अमित पठारे, विक्रांत ठाकूर हे तिघेही एकमेकांचे मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. हे तिघे जमिनीच्या प्लॉटिंगचा व्यवसाय करत होते. याच व्यवसायामधील व्यवहाराच्या वादातून हा गोळीबार केला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या गोळीबारानंतर अमित पठारे हे विक्रांत ठाकूर फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांचा शोध घेतला जात असून पोलीसांनी या घटनेबाबत अधिक तपास सुरू केला आहे.

महिन्याच्या सुरवातीलाही झाली होती हत्या

याआधी 1 नोव्हेंबरालाही पु्ण्यातील कोढवा परिसरात गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत गणेश काळे नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. गणेश काळेवर आंदेकर टोळीतील चार जणांनी सहा ते सात गोळ्या झाडल्या होत्या. गोळीबारानंतर त्याच्यावर कोयत्याने सपासप वार देखील करण्यात आले होते. कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात ही घटना घडली होती. गणेश काळे हा समीर काळे याचा भाऊ आहे. समीर हा सोमा गायकवाड टोळीतील सदस्य आहे. याच समीर काळेने वनराज आंदेकरच्या खूनात वापरलेली पिस्तूले मध्य प्रदेशातून आणली होती. समीर हा सध्या कारागृहात आहे. या घटनेनंतर आता पुन्हा एकदा पुण्यात गोळीबार करून हत्या करण्यात आली आहे.