
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेल रोखठोक बोलण्यासाठी ओळखले जातात. बैठकांमध्ये, जाहीर सभांमध्ये, कार्यकर्त्यांशी बोलताना ते आपलं मत ठामपणे मांडत असतात. शिरूर लोकसभा मतदारसंघात त्यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत अजित पवारांनी स्थानिक कार्यकर्त्याला एक प्रश्न विचारला. तेव्हा त्या कार्यकर्त्याची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. काल माढा आणि विशेषत: बारामतीत कमी प्रमाणात मतदान झालं. यावरही अजित पवारांनी भाष्य केलं.
आंबेगाव आणि शिरूर विधानसभेवर मोठी जबाबदारी आहे. या दोन्ही विधानसभेतून शिवाजी आढळरावांना एक लाखांहून अधिकच लीड मिळायला हवं, असं आवाहन अजित पवारांनी केलं. त्याचवेळी खालून एका उत्साही कार्यकर्त्याने शिवाजी आढळराव पाटलांचा… विजय असो, अशी घोषणा दिली. त्यावेळी क्षणाचा ही विचार न करता, अजित पवारांनी तुझा बूथ कोणता आहे रे? असा प्रश्न घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला विचारला. तेव्हा उपस्थितांमध्ये हशा पिकला.
तुझ्या मतदारसंघात किती मतदार आहेत? उत्तर आलं, 2700 मतदार आहेत. यावेळी अजित पवारांनी डोक्यावर हात मारला. लेका 2700चा बुथच नसतो. खोटं बोलतोय, मी अचानक प्रश्न विचारल्यानं तो गडबडलेला आहे. माझी तुम्हाला विनंती आहे. तुम्ही उत्साहाने घोषणा देता. पण लक्षात ठेवा, कालच्या मतदानात मतदानाचा टक्का खालावला आहे. हे भूषणावह नाही, असं म्हणत मतदानाच्या टक्केवारीकडे अजित पवारांनी लक्ष वेधलं.
आचारसंहिता असली तरी पिण्याच्या पाण्याबाबत सर्वांनी सहकार्य ठेवायला हवं. मात्र आचारसंहिता भंग होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. अनेकजण माझ्याकडे येतात अन म्हणतात जिल्हा परिषद सदस्य आहे. आता प्रशासक आहे. तुम्ही कुठले सदस्य, तुम्ही तर सर्व सामान्य नागरिक आहात. पण ते म्हणतात, आता त्यांना वाईट वाटायला नको म्हणून मी म्हणतो म्हणतायेत तर म्हणू द्या. कुठं आपल्या बापाचं काय जायचं आहे, मी म्हणतो तुम्हाला शुभेच्छा आहेत, असं अजित पवार म्हणाले.