Pune Ajit Pawar : माझं बोलणं काहींना झोंबत असेल, तर त्याला माझा नाईलाज; पुण्यातल्या वरूणराज भिडे पुरस्कार सोहळ्यात अजित पवारांची फटकेबाजी

मला थेट तोंडावर बोलायची सवय आहे. माझे बोलणे काही लोकांना झोंबत असेल, तर त्याला माझा नाईलाज आहे, असे अजित पवार यावेळी म्हणाले. तर प्रत्यकाने बोलताना भान ठेवले पाहिजे, असे म्हणत अमोल मिटकरी यांना पुन्हा एकदा अप्रत्यक्ष टोला त्यांनी लगावला आहे.

Pune Ajit Pawar : माझं बोलणं काहींना झोंबत असेल, तर त्याला माझा नाईलाज; पुण्यातल्या वरूणराज भिडे पुरस्कार सोहळ्यात अजित पवारांची फटकेबाजी
पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: May 01, 2022 | 11:43 AM

पुणे : पत्रकार आणि राजकारणी यांचे नाते हे एकमेकांना पूरक असते. दोघांची पाठ फिरली की ते कसा उद्धार करतात, हे आम्हाला माहीत आहे, अशी फटकेबाजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. ज्येष्ठ पत्रकार वरूणराज भिडे स्मृती पुरस्कार वितरण सोहळा पुण्यात (Pune) पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, की महाराष्ट्राच्या इतिहासात पत्रकारितेचे मोलाचे योगदान आहे. जे काम करतात ते चुकत असतात, जे कामच करत नाहीत, ते चुकणार कसे, असा सवाल त्यांनी केला. माध्यमांच्या (Media) बदलत्या स्वरुपावर ते म्हणाले, की कुणी काय दाखवावे हे ज्याचा त्याचा अधिकार आहे. काही वर्षांपासून मीडियाचे स्वरूप बदलत आहे. हे बदलते स्वरूप थक्क करणारे आहे. तर चार-दोन वर्षे काम केले, की लगेच त्याला ज्येष्ठ पत्रकार म्हटले पाहिजे, असे अनेकांना वाटते, असा टोला यावेळी अजित पवारांनी पत्रकारांना लगावला.

नोंद करण्यासारखी परिस्थिती

आताची जी परिस्थिती देशात आणि राज्यात निर्माण झाली आहे, त्याची नोंद घेतली पाहिजे, असे ते पत्रकारांना म्हणाले. सोशल मीडियावर बोलताना ते म्हणाले, की सोशल मीडियामुळे सेकंद सेकंदाची माहिती मिळत असते. भारतात 53 कोटी व्हाट्सअॅप वापरकर्ते आहेत. या आकडेवारीवरून सोशल मीडियाची ताकद कळते. सोशल मीडिया हे दुधारी हत्यार आहे. सोशल मीडियाला कायद्याच्या चौकटीत बसवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. यामध्ये मोठा धोका निर्माण झाले आहे. त्यामुळे हे वापरताना भान जपले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. सोशल मीडियाकडे एक नजर टाकली, तर अभासी जगात काय खरे आणि काय खोटे काही कळत नाही, असेही ते म्हणाले.

‘अनावश्यक लोकांना प्रसिद्धी नको’

मला थेट तोंडावर बोलायची सवय आहे. माझे बोलणे काही लोकांना झोंबत असेल, तर त्याला माझा नाईलाज आहे, असे अजित पवार यावेळी म्हणाले. तर प्रत्यकाने बोलताना भान ठेवले पाहिजे, असे म्हणत अमोल मिटकरी यांना पुन्हा एकदा अप्रत्यक्ष टोला त्यांनी लगावला आहे. अनावश्यक लोकांना प्रसिद्धी देऊ नये, असे पत्रकारांना सांगत राज ठाकरे यांच्यासह भावनिक राजकारण करणाऱ्यांनाही अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.