AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन मित्र, जुनी मैत्रीण अन् एक फोन कॉल... पुण्यात तरुणासोबत काय घडलं? CCTV पाहून तुम्हीही हादराल!

दोन मित्र, जुनी मैत्रीण अन् एक फोन कॉल… पुण्यात तरुणासोबत काय घडलं? CCTV पाहून तुम्हीही हादराल!

| Updated on: Feb 04, 2026 | 2:01 PM
Share

पुण्याच्या धनकवडी भागात एका जुन्या मैत्रिणीला फोन लावण्यावरून दोन मित्रांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात एकाने रसवंतीवरील कोयत्याने आपल्याच मित्रावर सपासप वार केले. या थरारक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला असून जखमी तरुणावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलाय की नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण नुकतंच पुण्यात एक थरारक घटना समोर आली आहे. एका जुन्या मैत्रिणीला फोन लावण्यावरून दोन मित्रांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हल्ल्यात झाल्याची घटनेने पुणे हादरलं आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाने आपल्याच मित्रावर उसाच्या रसवंतीवरील कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेचा अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य सुनील कांबळे (२१) आणि चेतन बाजीराव चव्हाण (२३) हे दोघे चांगले मित्र होते. सोमवारी २ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० च्या सुमारास ते दोघेही धनकवडी येथील त्रिमूर्ती चौकातील एका उसाच्या रसवंतीजवळ उभे होते. यावेळी गप्पा मारत असताना त्यांच्या एका जुन्या मैत्रिणीचा विषय निघाला. त्या मैत्रिणीला फोन करण्यावरून दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. मात्र हा वाद इतका विकोपाला गेला की चेतन चव्हाण याने रागाच्या भरात रसवंतीवरील लोखंडी कोयता उचलला. त्यानंतर आदित्यवर हल्ला चढवला.

या घटनेचा एक सीसीटीव्ही समोर आला आहे. यात ही सर्व धक्कादायक घटना कैद झाली आहे. या सीसीटीव्हीत चेतन हा आदित्यचा पाठलाग करून त्याच्यावर कोयत्याने वार करताना दिसत आहे. लाकूड तोडण्यासाठी जसे घाव घातले जातात, तसे घाव चेतन आदित्यवर घालत होता. जीव वाचवण्यासाठी आदित्य आरोपीच्या पाया पडत होता, गयावया करत होता. यावेळी परिसरात बघणाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती. मात्र कुणीही मध्यस्थी करून आदित्यला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही.

अतिदक्षता विभागात उपचार सुरू

या प्राणघातक हल्ल्यात आदित्य कांबळे गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या डोक्यावर आणि हातावर खोलवर जखमा झाल्या आहेत. त्याला तातडीने भारती विद्यापीठ रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्यच्या डोक्यात ३० पेक्षा अधिक टाके पडले असून सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.

भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी चेतन चव्हाण याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, ११८(२) सह अन्य कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान हा हल्ला इतका भीषण असतानाही पोलिसांनी अद्याप खुनाचा प्रयत्न (Attempt to Murder) हे कलम का लावले नाही, असा सवाल आदित्यच्या कुटुंबियांकडून केला जात आहे. पोलिसांनी केवळ इच्छापूर्वक जबर दुखापत करणे या कलमाखाली गुन्हा दाखल केल्याचा आरोप कुटुंबियांकडून केला जात आहे.

Published on: Feb 04, 2026 01:11 PM