
पुण्यातील आयटी हब या ठिकाणी असलेल्या हिंजवडी परिसरात काल सायंकाळी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे. एका खाजगी बसचे नियंत्रण सुटल्याने ती बस थेट फुटपाथवर चढली. या अपघातात एकाच कुटुंबातील ३ लहान मुलांचा बळी गेला. भर रस्त्यावर झालेल्या या दुर्घटनेमुळे हिंजवडीमधील वाहतुकीची सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा गंभीर ऐरणीवर आली आहे.
पुण्यातील हिंजवडी परिसरात काल संध्याकाळी ६.३० च्या दरम्यान भीषण अपघात घडला. आयटी कर्मचाऱ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसचा चालक छत्रपती शिवाजी चौकाजवळ पोहोचताच त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगात असलेली ही बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या फूटपाथवर चढली. यावेळी फुटपाथवर चालणाऱ्या अनेक पादचारी जखमी झाले. तसेच या बसच्या चाकाखाली चिरडल्याने देवा प्रसाद कुटुंबातील ८ वर्षांची अर्चना आणि तिचा ६ वर्षांचा लहान भाऊ सुरज यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
या अपघातात त्यांची मोठी बहीण प्रिया देवा प्रसाद (१४) ही जखमी झाली होती. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच तिचाही मृत्यू झाला. अवघ्या काही तासांच्या अंतराने एकाच कुटुंबातील तीन निरागस बालकांना जीव गमवावा लागल्याने त्यांच्या आई-वडिलांवर आणि कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
या अपघातात प्रिया देवा प्रसाद यांच्यासह अन्य तीन पादचारी देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या जखमींमध्ये अविनाश हरिदास चव्हाण (२६) आणि विमल राजू ओझरकर (४०) यांचा समावेश आहे. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी एकच गर्दी केली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी पोलिसांनी बसचा चालक नागनाथ गुजर याला तत्काळ अटक केली आहे. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे उघड झाले.
तसेच हिंजवडी पोलिसांनी केवळ चालकालाच नव्हे तर बस पुरवणारा मॅनेजर भाऊसाहेब घोलप यालाही अटक केली आहे. चालकाची योग्य तपासणी न करता त्याला कामावर ठेवल्याबद्दल आणि सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हिंजवडी पोलिसांनी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.
दरम्यान हिंजवडी आयटी पार्क परिसरात अवजड वाहनांची अनियंत्रित वर्दळ, खराब रस्ते आणि चालकांचा बेदरकारपणा यामुळे वारंवार अपघात होत आहेत. या घटनेमुळे प्रशासनाला कठोर पाऊले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा अपघातांचे हॉटस्पॉट बनलेल्या या परिसरात असे बळी जातच राहतील, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.