पुणे विधानसभा पोटनिवडणूक, काँग्रेसचा मास्टर प्लॅन तयार,भाजप-राष्ट्रवादी कुठे?

| Updated on: Jan 24, 2023 | 12:45 PM

कसबा व पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची आशा धुसर झाली आहे. महाविकास आघाडीने निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यानंतर आता काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी वक्तव्य केले आहे.

पुणे विधानसभा पोटनिवडणूक, काँग्रेसचा मास्टर प्लॅन तयार,भाजप-राष्ट्रवादी कुठे?
निवडणुका जाहीर
Follow us on

पुणे : पुणे शहरात भारतीय जनता पक्ष (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. पुणे शहरावर वर्चस्व मिळवण्यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरु असतात. आता पुणे शहरातील कसबा व पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक २७ फेब्रुबारी रोजी होत आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याची आशा धुसर झाली आहे. महाविकास आघाडीने निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यानंतर आता काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी वक्तव्य केले आहे.

काँग्रेसची तयारी

नाना पटोले पुणे शहरातील कसबा पोटनिवडणुकीसंदर्भात बोलतांना सांगितले की, कसबा मतदार संघात १९८० पर्यंत काँग्रेस पक्षाचे प्राबल्य होते. या ठिकाणांवरुन निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस पक्षातील अनेक जण इच्छुक आहेत. आमच्याकडे उमेदवारांची रीघ लागली आहे. आठ ते दहा जणांनी माझ्याकडे अर्ज केले आहेत. येत्या ३ किंवा ४ फेब्रुवारीपर्यंत आम्ही उमेदवार जाहीर करू. यासाठी आमचा मास्टर प्लान तयार आहे. त्यावर आमचे काम सुरू आहे, अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादी लढणार, ठाकरे गट इच्छूक

राष्ट्रवादीकडून रुपाली ठोंबरे पाटील यांनी निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. त्यांनी पक्षाकडे तशी मागणी केली आहे. त्यांच्यानंतर आता उद्धव ठाकरे गटानेही कसब्यातून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. कसब्याची जागा उद्धव ठाकरे गटाला देण्याची मागणी माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी केली आहे. ते स्वतः कसब्यातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. म्हणजेच कसबा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष लढवण्यास इच्छूक आहे. आपण यासंदर्भात सोमवारी किंवा मंगळवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले होते. परंतु अजूनही महाविकास आघाडीचा निर्णय झाला नाही.

भाजप पत्ते उघडण्यास तयार नाही

कसबा आणि पिंपरी चिंचवड हे दोन्ही मतदार संघ भाजपकडे होते. भाजपच्या मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. या ठिकाणीवरुन भाजप कोणाला उमेदवारी देणार हे अजून उघड झालेले नाही. परंतु टिळक परिवार आणि जगताप परिवार या निवडणुका लढवण्यास इच्छूक आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्ही नावे पक्षाच्या केंद्रीय समितीकडे पाठवली असल्याचे सांगितले.

मनसे काय करणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात बुधवारी शिवतीर्थावर बैठक होणार आहे. या बैठकीत राज ठाकरे उपस्थित राहणार आहे. दोन्ही जागा मनसे बिनविरोध करण्यासाठी पाठिंबा देणार की लढवणार, याचा निर्णय या बैठकीत घेण्यात येणार आहे.