डॅम इट! भुशी डॅम परिसरात नाकाबंदी, पोलिसांची नजर चुकवत पर्यटकांची धबधब्यांवर गर्दी

| Updated on: Jul 18, 2021 | 9:58 AM

पुणे जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांवर आजपासून कलम 144 लागू करण्यात आलेला आहे. पोलिसांनी थेट भुशी डॅमकडे जाणाऱ्या मार्गावरच नाकाबंदी केली आहे. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना भुशी धरण परिसरातूनच परत पाठवले जात आहे.

डॅम इट! भुशी डॅम परिसरात नाकाबंदी, पोलिसांची नजर चुकवत पर्यटकांची धबधब्यांवर गर्दी
भुशी धरण परिसरात नाकाबंदी
Follow us on

पुणे : पावसाळी वातावरणात पर्यटकांची पावलं आपसूकच धरणं, धबधबे यासारख्या ठिकाणी वळतात. पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या लोणावळ्यातील भुशी धरण परिसरात (Bhushi Dam) पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. शनिवारी पर्यटकांनी गर्दी केल्याचं वृत्त ‘टीव्ही9 मराठी’ने दाखवल्यानंतर प्रशासनाने कारवाई केली. मात्र पोलिसांची नजर चुकवत पर्यटकांनी परिसरातील धबधब्यांकडे कूच केलं.

पोलिसांनी थेट भुशी डॅमकडे जाणाऱ्या मार्गावरच नाकाबंदी केली आहे. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना भुशी धरण परिसरातूनच परत पाठवले जात आहे. काल याच ठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. यासंबंधी वृत्त ‘टीव्ही9 मराठी’ने प्रसारित केल्यावर प्रशासन खडबडून जागं झाल्याचं दिसत आहे. मात्र भुशी धरण परिसराआधी जे धबधबे आहेत त्या धबधब्यांवर पोलिसांची नजर चुकवत पर्यटकांनी गर्दी केली.

पुणे जिल्ह्यात सर्वच पर्यटन स्थळांवर कलम 144 

ज्या जिल्ह्यांमध्ये किंवा ज्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे, अशा ठिकाणी वीकेंड लॉकडाऊन सुरु आहे. परंतु नागरिकांना याचं कसलंही भान राहिलं नाही. लॉकडाऊन असून देखील नागरिक मोठ्या संख्येने विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. अशात शासन आणि प्रशासन कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात यावी म्हणून विविध प्रयत्न करत आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांवर आजपासून कलम 144 लागू करण्यात आलेला आहे.

खडकवाल्यात नाकाबंदी, गाड्यांची तपासणी

लॉकडाऊन असूनही पुण्यातील खडकवासला येथे पर्यटक मोठ्या संख्येने आले आहेत. या ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली असून नेमक्या कोणत्या कारणास्तव नागरिक घराबेहर पडले आहेत, याची ते माहिती घेत आहेत. तसंच गाड्यांची तसापणी करत आहेत.

तर कारवाईला सामोरं जावंच लागेल!

पुणे जिल्ह्यात अनेक किल्ले आहेत. तसंच प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण लोणावळा-खंडाळाही आहे. राज्यातल्या महत्त्वाच्या शहरातून वीकेण्ड एन्जॉय करण्यासाठी पर्यटकांची पुण्याकडे ओढ असते. असे पर्यटक जर घराबाहेर पडणार असतील तर त्यांना कारवाईला सामोरं जावं लागेल म्हणून सावधान…!

संबंधित बातम्या :

पुणे जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळावर कलम 144, पर्यटनासाठी बाहेर पडाल तर कारवाई होणारच!

(Pune Lonavla Bhushi Dam Area Police Nakabandi)