पुणेकर मतदानासाठी सज्ज, पण वाहतुकीत मोठा बदल; कोणते रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते?
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे वाहतूक पोलिसांनी १४ ते १६ जानेवारी दरम्यान शहरात मोठे वाहतूक बदल जाहीर केले आहेत. हडपसर, कोरेगाव पार्क आणि पेठांमधील बंद मार्ग आणि पर्यायी रस्त्यांची सविस्तर

राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची धामधूम सुरु आहे. पुणे महानगरपालिकेच्या रिक्त जागांसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान पार पडणार आहे. या कालावधीत शहरातील विविध मतदान केंद्रांवर नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रशासनाकडून मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागण्याची शक्यता लक्षात घेता कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मतदानाची ही प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी, तसेच मतदारांना केंद्रांपर्यंत पोहोचताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांनी पुणे शहराच्या विविध भागांतील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल केले आहेत.
पुणे शहरात आगामी महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ नये, यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी १४ ते १६ जानेवारी या कालावधीत विशेष नियमावली जाहीर केली आहे. सकाळी ६ ते सायंकाळी ७ या वेळेत शहरातील विविध भागांतील प्रमुख रस्ते बंद राहतील. पुणे शहरातील महत्त्वाच्या सहा वाहतूक विभागांतर्गत येणाऱ्या रस्त्यांवर हे बदल करण्यात आले आहेत. या काळात जड वाहने आणि खाजगी वाहनांना विशिष्ट ठिकाणी प्रवेशबंदी असेल.
१. हडपसर परिसर
हडपसरमध्ये मतदानाची मुख्य केंद्रे असल्याने या भागात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
- बंद मार्ग: साने गुरुजी परिसराकडे जाणारा मुख्य मार्ग पूर्णपणे बंद राहील.
- पर्यायी मार्ग: वाहनचालकांनी हडपसर वेस्ट अमरधाम स्मशानभूमी मार्ग किंवा माळवाडी डी.पी. रस्त्याचा वापर करावा. तसेच हडपसर गाडीतळ येथून संजीवनी हॉस्पिटल डी.पी. रस्त्याने सिद्धेश्वर हॉटेलकडे जाता येईल.
२. कोरेगाव पार्क परिसर
व्हीआयपी हालचाली आणि संवेदनशील केंद्रामुळे कोरेगाव पार्कच्या अंतर्गत रस्त्यांवर निर्बंध आहेत.
- बंद मार्ग: नॉर्थ मेन रोड (लेन क्रमांक ‘सी’) ते पाणीपुरवठा केंद्र, बंडगार्डन घाट आणि महात्मा गांधी चौक ते मौलाना अब्दुल कलाम आझाद स्मारक.
- पर्यायी मार्ग: कोरेगाव पार्क जंक्शन ते एबीसी फार्म या मुख्य रस्त्याचा वापर करून नागरिक आपले इच्छित स्थळ गाठू शकतात.
३. समर्थ वाहतूक विभाग
पुणे स्टेशन आणि मध्यवर्ती पेठांना जोडणाऱ्या या भागात मोठे फेरबदल आहेत.
- बंद मार्ग: पॉवर हाऊस चौक ते बालाजी चौक, संत कबीर चौक ते क्वार्टर गेट चौक आणि रामोशी गेट ते जुना मोठा स्टँड.
- पर्यायी मार्ग: वाहनचालकांनी शांताई हॉटेल, क्वार्टर गेट चौक, बाहुबली चौक आणि ‘सेव्हन लव्हज’ चौक या व्यापारी मार्गाचा वापर करावा.
४. विमानतळ परिसर
- बंद मार्ग: फिनिक्स मॉलच्या मागील बाजूचा रस्ता, सॉलिटेअर इमारत आणि निको गार्डन परिसरातील अंतर्गत रस्ते पूर्णपणे बंद राहतील.
- पर्यायी मार्ग: विमान नगर चौक, श्रीकृष्ण हॉटेल चौक आणि दत्त मंदिर चौक या मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे.
५. विश्रामबाग आणि दत्तवाडी विभाग
- विश्रामबाग: पुरम चौक ते टिळक चौक दरम्यानची वाहतूक बंद असेल. नागरिकांनी शास्त्री रस्त्याने दांडेकर पुलामार्गे प्रवास करावा.
- दत्तवाडी: बाजीराव रस्त्यावरील सनस पुतळा ते ना. सी. फडके चौक आणि सारसबाग खाऊ गल्ली मार्ग बंद असेल. येथील वाहतूक अप्पा बळवंत चौक (ABC) आणि पुरम चौकातून वळवण्यात आली आहे.
