Amit Shah : थोरले बाजीराव पेशवे यांचं स्मारक बनवण्याची योग्य जागा NDA च – अमित शाह
"इंग्रजांच्यासमोर स्वराज्यासाठी लढण्याची वेळ आली, तेव्हा सर्वात आधी सिंहगर्जना टिळकांनी केली. वीर सावरकरांनी याच महाराष्ट्राच्या भूमीतून उदहारण घालून दिलं. एक व्यक्ती देशासाठी काय करू शकतो हे सावरकर यांनी दाखवलं" असं अमित शाह म्हणाले.

“मी पुण्याच्या भूमीत उभा आहे. सर्वात आधी ज्यांनी गुलामीच्या काळरात्री आशेचा किरण दाखवला, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, शिवाजी महाराजांना मी प्रणाम करतो. पुण्याची भूमी एक प्रकारे स्वराज्याच्या संस्काराची उगमस्थान आहे. 17 व्या शतकात या ठिकाणाहून स्वराज्याचा आलेख, तंजावूरपासून अटक ते अटक पासून कटक पर्यंत आला” असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. थोरले बाजीराव पेशवे यांचा, खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. त्याच्या अनावरणाप्रसंगी ते बोलत होते.
“इंग्रजांच्यासमोर स्वराज्यासाठी लढण्याची वेळ आली, तेव्हा सर्वात आधी सिंहगर्जना टिळकांनी केली. वीर सावरकरांनी याच महाराष्ट्राच्या भूमीतून उदहारण घालून दिलं. एक व्यक्ती देशासाठी काय करू शकतो हे सावरकर यांनी दाखवलं. एनडीएची मूळ स्थापना झाली असेल, तेव्हा काय विचार केला असेल. तेव्हा वातावरण चांगलं होतं. म्हणून एनडीए बनवली आहे. पण इंग्रजांना माहीत नाही की या ठिकाणी येणारं शतकभर भारताच्या सुरक्षेचं स्थान होईल हे इंग्रजांना माहीत नाही” असं अमित शाह म्हणाले.
‘मला वाटतं भारताच्या सीमेला स्पर्श करण्याची कोणी हिंमत करणार नाही’
“बाजीरावांचे पुतळे देशभरात आहेत. माझ्या गावात आहे. पण स्मारक बनवण्याची योग्य जागा ही एनडीएच आहे” असं अमित शाह म्हणाले. “श्रीमंत बाजीरावांच्या मूर्तीपासून प्रेरणा घेऊन त्यांच्या जीवनाचा अभ्यास करावा. मला वाटतं अनेक वर्ष भारताच्या सीमेला स्पर्श करण्याची कोणी हिंमत करणार नाही” असं अमित शाह म्हणाले.
‘युद्धात व्यूहरचनेचं महत्त्व’
“काल काही पत्रकार मित्रांसोबत चर्चा केली. त्यांनी सांगितलं की, अमित भाई, तुम्ही पुण्यात एका स्पेशल कार्यक्रमासाठी जात आहात. आजच्या युद्धाची पद्धती आणि बाजीराव पेशवाच्या काळातील युद्धाची पद्धती यात काय साम्य असेल. असं विचारलं. मी त्यांना सांगितलं, युद्धाचे काही नियम कालबहाय्य होत नाही. युद्धात व्यूहरचनेचं महत्त्व, त्वरेचं महत्त्व, समर्पणाचा भाव, देशभक्तीचा भाव आणि सर्वात मोठी गोष्ट युद्धात बलिदानाचा भाव हाच सैन्याला विजय मिळवून देतो. हत्यारं बदलत असतात. युद्धाच्या या कलेचा भाव केवळ बाजीराव पेशवा यांच्यातच होता. 19 वर्षाच्या वयात शाहू महाराजांनी त्यांना कशा पद्धतीने सिलेक्ट केलं असेल मला माहीत नाही. तेव्हा खूप आव्हान होतं” असं अमित शाह म्हणाले.
’20 वर्षात 41 युद्ध लढली’
“शाहू महाराजांनी बाजीराव पेशव्यांची निवड केली. त्यांनी 20 वर्षात 41 युद्ध लढली. एकही युद्ध हरले नाहीत. हा रेकॉर्ड कोणत्याच सेनापतीचा नाही. एका वर्षात दोन युद्ध होतात. त्याकाळी पावसाळ्यात चार महिने युद्ध होत नव्हती. म्हणजे 8 महिन्यात दोन युद्ध करून जिंकले. असे वीर सेनानी होते ते” अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्याच कौतुक केलं. “शिवाजी महाराजांनी स्वराज्याची कल्पना केली असेल तेव्हा भारताचा भूगोल. त्यावेळचा भारताच्या साम्राज्याचा इतिहास पाहिल्यावर १२ वर्षाच्या मुलाने काय विचार केला असेल याचा विचार करा” असं अमित शाह म्हणाले.
